पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली असून आता पूरग्रस्तांसमोर नव्याने संसार उभारण्याचं आव्हान आहे. यावेळी पुरामुळे साचलेली घाण मोठी समस्या झाली आहे. कोणत्याही एका मंत्र्याने आमच्या घराजवळ येऊन तासभर थांबून दाखवा असं आव्हानच पूरग्रस्त वैशाली जाधव यांनी दिलं आहे.
“आमची घरं आठ दिवसांपासून पाण्याखाली होती. यादरम्यान आम्हाला काय हवं काय नको ? याबद्दल साधी कोणी विचारपूसदेखील केली नाही. उलट आम्हाला उंदीर, घुशी यांच्या घाणीमध्ये आणून ठेवलं आहे. यामुळे आमच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून याकडे प्रशासनाच्या कोणत्याही अधिकार्याने लक्ष दिले नाही. पण याचदरम्यान मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सांगलीत येऊन गेले. अधिकार्यांप्रमाणे मंत्र्यानी देखील आमच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. ज्या मंत्र्यांना खरंच आमची काळजी असल्याचे सतत दाखविले जाते, त्यातील एकाने तरी आमच्या घराजवळ येऊन एक तासभर येऊन थांबावे”, असं वैशाली जाधव यांनी म्हटलं आहे.
सांगली आणि कोल्हापुरात पुरामुळे लाखो नागरिकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे अनेक नागरिकांना आसपासच्या शाळा, महाविद्यालयामध्ये राहावे लागत आहे. मात्र रविवारपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पाण्याची पातळी काही प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे अनेक लोक पुन्हा आपल्या घऱी परतत असून नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहेत.