सांगली : राज्यात विविध सिंचन योजनांमध्ये सर्वात कमीत कमी वेळेत, जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणून कृषी विकास साधण्यामध्ये तत्कालीन अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांच्या नेतृत्वाखालील जलसंपदा विभागातील सांगली पाटबंधारे मंडळ अव्वल ठरले आहे. ताकारी, म्हैसाळ योजना – १ लाख ४ हजार आणि टेंभू ७८ हजार हेक्टर. एकूण १ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
राज्यातील ६२ मंडळांमध्ये सांगली मंडळाचे काम राज्यस्तरावर उत्कृष्ठ ठरले. याबद्दल शुक्रवारी सांगली पाटबंधारे मंडळाकडील अभियंत्यांचा खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
टेंभू योजनेसाठी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली, ताकारी व म्हैसाळ योजनेला गती देऊन आज या योजनेमध्ये प्रस्तावित असलेले ९५ टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या पुणे येथे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले आणि सांगलीत अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत असताना गुणाले यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत या योजनांना गती विक्रमी सिंचन व्यवस्था उभी केली. टेंभूची बंदिस्त नलिका जलवितरण प्रणाली तर राज्याला पथदर्शक ठरली. यामुळे भूसंपादन करीत असताना येणार्या अडचणीवर मात करीत जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणण्यात यश आले आहे.
हेही वाचा – मराठवाड्यातील शेती संकटात, देशभरातील ३१० जिल्ह्यांना बदलत्या पर्यावरणाचा फटका
सांगली पाटबंधारे मंडळ राज्यात अव्वल ठरले असतानाच सांगलीत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले सचिन पवार यांना उत्कृष्ठ अभियंता हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी सांगली जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेत वृद्धी करण्यामध्ये कार्यरत असलेले अभियंता महेश रासनकर, अमर सुर्यवंशी, ज्योती देवकर, अभिनंदन हारूगडे, रोहित कोरे, राजन डवरी आदींचा सत्कार करण्यात आला.