सांगली : ‘सेक्स’ला नकार दिला म्हणून विद्यार्थिनीचा खून ; प्राध्यापकाला अटक

लॉजवर नेऊन तिचा काटा काढण्याचा त्याचा प्लॅन होता

सांगली येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील मुक्त विद्यापीठामध्ये एका विद्यार्थिनीचा खून केल्याची खळबळजनक घटना रविवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी एका प्राध्यापकाला अटक केली आहे. ऋषिकेश मोहन कुडाळकर (वय-२७ रा. कसबेडिग्रज) असं अटक केलेल्या प्राध्यापकाचं नाव असून शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने खून केल्याची कबुली आरोपीने दिली असल्याची माहिती आहे. आरोपीला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथून अटक करण्यात आली आहे.

सांगलीच्या शांतिनिकेतन येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधील विद्यार्थिनी वैशाली नलवडे – मुळीक हिची रविवारी निर्घुण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. वैशाली मुळीक ही विवाहीत होती आणि तिला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. मुक्त विद्यापीठामध्ये एसवायबीएच्या वर्गात तिने प्रवेश घेतला होता. आठवड्यातून एक दिवसच फक्त रविवारी मुक्त विद्यापीठ सुरू असते. त्यामुळे शांतिनिकेतन आवारातील अन्य शाळांच्या वर्ग खोल्या अध्यापनासाठी वापरण्यात येतात. तिसऱ्या मजल्यावर पाचवीच्या वर्गात भरणाऱ्या मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेच्या तिसऱ्या वर्गाच्या खोलीत तिचा खून करण्यात आला होता.

ही घटना समोर आल्यानंतर सुरुवातीला आत्महत्या की घातपात याबाबत पोलिसांच्या समोर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शवविच्छेदन केल्यानंतर वैद्यकीय अहवालामध्ये वैशालीचा गळा दाबून तसेच भिंतीवर डोके आपटल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये सकाळी दहाच्या सुमारास वैशालीसोबत एक व्यक्ती शाळेतील तिसर्‍या मजल्यावरील पाचवीच्या वर्गात गेल्याचे दिसत होते. त्यानंतर पंधरा मिनिटांनी तिच व्यक्ती शर्टच्या बाह्या दुमडून वर्गातून बाहेर पडल्याचेही सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांच्या निदर्शनास आले. ती व्यक्ती प्राध्यापक ऋषिकेश मोहन कुडाळकर असल्याचं समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ऋषिकेशचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना ऋषिकेश कुडाळकर सांगोल्यात असल्याची माहिती खबर्‍याकडून मिळाल्यानंतर सांगोला येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

काय होता प्लॅन-

वैशालीने शारिरिक संबंधाला नकार दिल्याने ओढणीने गळा आवळून, भिंतीवर डोके आपटून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांच्या चौकशीत दिल्याचं समजतंय. वैशाली आणि आरोपी ऋषिकेश यांच्यामध्ये अनैतीक संबंध होते. मात्र, वैशालीचे माहेरच्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध निर्माण झाले होते. हे समजल्यावर ऋषिकेशला प्रचंड राग आला होता. लॉजवर नेऊन तिचा काटा काढण्याचा त्याचा प्लॅन होता. त्यासाठी रविवारी तो तिला लॉजवर घेऊन जाण्यासाठी आला होता. त्याने वैशालीकेडे शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र तिने त्याला नकार दिला. याचा राग आल्याने त्याने वैशालीच्या ओढणीने तिचे तोंड, गळा आवळला. नंतर तिचे डोके भिंतीवर आपटले आणि तिची हत्या केली, त्यानंतर तो वर्गातून निघून गेला. लॉजवर नेऊन तिचा काटा काढण्याचा त्याचा प्लॅन होता. मात्र, शाळेत आल्यानंतर त्यांच्यात वाद झाल्याने तिचा शाळेतच खून केला. आरोपीला संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला आज (मंगळवारी) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sangli student murder case professor arrested

ताज्या बातम्या