…म्हणून मी राजीनामा दिला; संजय राठोडांनी दिलं राजीनाम्याबाबत स्पष्टीकरण

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते

Sanjay rathod resigned cabinet minister Thackeray govt

राज्यात काही महिन्यांपूर्वी पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण तापलं होतं. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या माजी वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी आपला मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. विधिमंडळाचं अधिवेशन तोंडावर असतानाच भाजपानं संजय राठोड यांच्या यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांनीही राठोड यांना निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून थेट संजय राठोड यांच्यावर आरोप केला होता. तर राठोड यांनी पोहरादेवी येथे माध्यमांशी बोलताना चौकशीतून सगळं समोर येईल. आपली बदनामी केली जात असल्याचाही आरोपही त्यांनी केला होता. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना भाजपा नेत्यांनी राठोडांचा राजीनामा घेऊ कारवाई करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर आता ‘मी एका प्रकरणादरम्यान राजीनामा दिला आहे, आता परत मला मंत्रीपद द्यायचं की नाही हा संपूर्ण निर्णय माननीय मुख्यमंत्री साहेबांचा आहे मात्र मी माझ्या समाजासाठी काम करत राहणार’ असं माजी मंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. सोलापूर येथे संजय राठोड बोलत होते. “मी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. जेव्हा आरोप झाले अधिवेशन चालू देणार नाही असे म्हटले गेले. मी ज्या पक्षात आहे त्याचे नेते म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा स्वच्छ काम करणारे म्हणून आहे. मन लावून ते प्रामाणिकपणे एकनिष्ठेने काम करत आहेत. त्यामुळे मला वाटलं जे आरोप झाले त्याबाबत जे काही होईल ते पाहू. मी बाजूला राहतो करा तुम्ही चौकशी,” असे संजय राठोड यांनी म्हटले आहे.

दरम्यान, सरकारनं राठोडांवर कारवाई केली नाही, तर अधिवेशनाचं कामकाज चालू देणार नाही, असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतपाटील यांनी दिला होता. त्यामुळे सरकारवर दबाव वाढला होता. त्यानंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाच्या चौकशीनंतरच राजीनामा स्वीकारण्याची विनंती राठोड यांनी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली होती. वर्षा निवासस्थानी झालेल्या चर्चेनंतर संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sanjay rathod resigned cabinet minister thackeray govt abn

ताज्या बातम्या