चार महिन्यांपूर्वी शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती. कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊतांना अटक करण्यात आली. त्यानंतर १०० दिवसाने संजय राऊत जेलमधून बाहेर आले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

कर्नाटकमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव न्यायालयाने समन्स बजावलं आहे. बेळगाव न्यायालयात १ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश राऊत यांना देण्यात आले आहे. यानंतर संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

“तुम्हाला काय तुरुंगात टाकायचं ते टाका. मी घाबरणार नाही. सीमा प्रश्नासाठी शिवसेनेने यापूर्वी ६९ हुतात्मे दिले आहेत. मी ७० वा हुतात्मा होण्यास तयार आहे. यामागे आपल्यावर हल्ला करण्याचं कारस्थान आहे. कर्नाटक सरकारने कायद्याचे बडगे दाखवून तुरुंगात डांबलं तर त्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटतील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“२०१८ साली केलेल्या भाषणाची आता दखल घेऊन त्यांनी मला न्यायालयात हजर राहायला सांगितलं आहे. याचा अर्थ असा की, बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावं, अशा प्रकारचं कारस्थान सुरू असल्याचं माझ्या कानावर आलं आहे,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे.