चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप फेटाळत राऊतांनी पाटलांवर टीकास्त्र सोडलं आहे. आपण पाटलांवर सव्वा रुपयांचा दावा ठोकणार असून त्यांची तेवढीच किंमत आहे, असंही ते म्हणाले होते. राऊत यांच्या याच विधानावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाचा अर्ज दाखल झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, हरकत नाही. कोणी १०० कोटी, कोणी १५० कोटी तसं हे सव्वा रुपया. फक्त ते माझे मित्र असल्याने मी त्यांना सुचवेन की थोडी अमाउंट वाढवावी लागेल. त्याचं कारण असं की, शेवटी मानहानीचा दावा म्हणजे काय? तर माझी एवढ्या रकमेची मानहानी झाली. संजय राउतांची मानहानी सव्वा रुपयाची नाही. त्यामुळे त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही. राजकारणात आम्ही एकमेकांना चिमटे काढतो, पण त्याची जखम होता कामा नये. त्यामुळे संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयाची नक्कीच नाही.

हेही वाचा – संजय राऊत चंद्रकांत पाटलांवर ठोकणार सव्वा रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा; म्हणाले, “हे असले धंदे…”

काय म्हणाले होते संजय राऊत?

“पीएमसी बँक घोटाळ्याबाबत पाटील जे काही बोललेत, त्यांनी जे आरोप केलेत ते मला मान्य नाही. आम्ही असले फालतू धंदे करत नाहीत. असे घोटाळे केले असते तर मी इतक्या वर्षात राजकारणात राहिलो नसतो. पाटलांनी जे म्हटलंय त्या संदर्भात त्यांना पुढच्या चार दिवसांत कायदेशीर नोटीस पाठवण्यात येईल आणि त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे. मात्र मी इतरांप्रमाणे कोट्यवधी रुपयांचा दावा ठोकणार नाही. मी पाटलांवर केवळ सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे. कारण पाटलांची लायकी कोट्यवधी रुपयांची नाही. त्यांची किंमतच केवळ सव्वा रुपया आहे,” अशी टीका राऊत यांनी केली. तसेच “भाजपाच्या नेत्यांच्या तोंडाची गटारं झाली असून ते तोंडात येईल ते बोलतात. देशात न्यायालयं नाहीत का, फक्त ईडीचीच कारवाई का होते. भाजपाच्या लोकांनी ईडीसारख्या संस्थांना बदनाम केलंय. ईडीचे यांच्या घरी भांडी घासायला येते का,” असा सवालही राऊतांनी केला.