Sanjay Raut on India-Pakistan Match: पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे अनेक लोकांचे प्राण गेले. त्या जखमा अद्याप भरल्या गेलेल्या नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामना कशासाठी खेळत आहात? असा सवाल उपस्थित करत शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून आज राज्यभरात आंदोलन केले जात आहे. पाकिस्तान बरोबर होत असलेल्या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केले जात आहे.

या आंदोलनाची माहिती देत असताना शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी सामन्याला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर जहाल टीका केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल केलेल्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला.

अजित पवार काय म्हणाले होते?

भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हटले की, खेळाकडे खेळाच्या नजरेतून बघावे की नाही बघावे. हा प्रत्येकाचा अधिकार आहे, तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काहीना काही भूमिका घेण्याचे निमित्त विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये, असे माझे आवाहन आहे.

अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त

अजित पवारांच्या विधानावर संजय राऊत यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते चांगलेच संतापले. अजित पवारांवर टीका करताना ते म्हणाले, अजित पवारांच्या अंगात पाकड्यांचे रक्त वाहत आहे. अजित पवार अर्धे पाकिस्तानी आहेत. महाराष्ट्राचा मंत्री जर भारत-पाकिस्तान सामना पाहण्याची भाषा वापरत असेल तर ती राष्ट्रभक्त नागरिकाची भाषा नाही. पहलगाम येथे मृत्यूमुखी पडलेल्या २६ लोकांमध्ये तुमच्या घरातील कुणी असते तर तुम्ही असे बोलला नसतात. जर त्या २६ लोकांमध्ये तुमचा एखादा ठेकेदार जरी असता, तरी तुम्ही हे बोलला नसता.

संजय राऊत यांनी अजित पवारांबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा पक्ष नसून अमित शाह यांची छोटी कंपनी आहे. तात्पुरत्या स्वरुपात शेअर बाजारात टाकलेला माल आहे. देशाच्या आज भावना काय आहेत आणि ही लोक काय बोलत आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

जय शाह यांचा क्रिकेट संघावर दबाव

माध्यमांशी बोलत असताना आज संजय राऊत यांनी बीसीसीआय, भाजपा आणि जय शाह यांच्यावर टीका केली. भारतीय क्रिकेट संघालाही आजचा सामना खेळायचा नाही. काही क्रिकेटपटूंशी आमचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद झाला असून त्यांचा या सामन्याला विरोध आहे. मात्र त्यांची अडचण असल्यामुळे त्यांना सामना खेळावा लागत असल्याचा दावा, संजय राऊत यांनी केला.