लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी ऐन रंगात आलेली असताना आरोप-प्रत्यारोपांनाही वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात येऊन महायुतीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. मोदींच्या टीकेला आता विरोधकांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. दरम्यान, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांवरून संजय राऊतांनी मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदी, जीएसटी, उद्योगपतींची कर्ज माफ करणे यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. दैनिक सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने टीका केली आहे.

मोदींच्या कार्यकाळात देशाला काय मिळालं?

“कार्यवाहक पंतप्रधान मोदी हे सध्या विकास, लोककल्याण, गरिबी हटवण्यावर बोलू लागले आहेत. त्यांचे बोलणे वरवरचे आहे, पण देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. मोदी यांनी देशाची सूत्रे २०१४ साली हाती घेतली तेव्हा देशावर ४९ लाख कोटी कर्ज होते. २०२४ साली कर्जाचा आकडा २०५ लाख कोटींवर जाऊन पोहोचला, पण या कर्जाच्या बदल्यात देशाला काय मिळाले? देशातील मोठा वर्ग गरिबी, बेरोजगारीशी संघर्ष करतो आहे व महागाई हटवण्याची मोदींची घोषणा फोल ठरली आहे?”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
Uddhav Thackeray
“महाराष्ट्रात गद्दारांचे दोन मालक..”, उद्धव ठाकरेंची मोदी-अमित शाह यांच्यावर बोईसरच्या सभेत टीका
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

मोदींनी अर्थव्यवस्थेबाबत लहरीपणा दाखवला

“मोदी यांना सामाजिक भान नाही. राष्ट्रीय विचार त्यांच्याकडे नाही. सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही नीती म्हणजे राष्ट्रकारण नाही. मोदी यांना अर्थशास्त्र अजिबात कळत नाही. मोदी हे व्यापारी आहेत असे ते स्वतःच सांगतात, पण स्वतःचा गल्ला मोजणे वेगळे व देशाला आर्थिक दिशा देणे वेगळे. मोदी यांनी अर्थव्यवस्थेबाबत जो लहरीपणा दाखवला तो धक्कादायक आहे”, असंही ठाकरे गटाने म्हटलंय.

हेही वाचा >> शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”

नोटाबंदीनंतर ९८ टक्के नोटा परत आल्या

“मोदींना एकदा लहर आली व त्यांनी अचानक टी.व्ही. माध्यमांवर येऊन नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. काळा बाजार, काळा पैसावाल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी आपण हे क्रांतिकारक पाऊल उचलले असल्याचे मोदी यांनी जाहीर केले. त्या निर्णयाने एकच हाहाकार उडाला. लहान व्यापारी मोडून पडले. बँकांसमोर रांगा लागल्या. त्या रांगांत अनेकांना मृत्यू आला, पण त्यातून काळ्या पैशांचा बीमोड झाला काय? तर अजिबात नाही. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी मोदींची नोटाबंदी हा काळे धन सफेद करण्याचा एक खेळ असल्याचे परखडपणे सांगितले. नोटाबंदी केल्यानंतर ९८ टक्के नोटा परत आल्या”, अशी टीकाही करण्यात आली.

मोदी आर्थिक ढाचाच उद्ध्वस्त करत आहेत

“मोदी सरकारने कर दहशतवादाचा वापर करून उद्योग-व्यापारास मोठीच हानी पोहोचवली आहे. केंद्र सरकारने ‘एक देश, एक कर’ हे धोरण राबवून ‘जीएसटी’नामक राक्षस लोकांच्या मानेवर बसवला. जीएसटीच्या नावाखाली होणारी लूट म्हणजे एक प्रकारचा कर दहशतवाद आहे. जीएसटीमुळे राज्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर, संघराज्य पद्धतीवर गदा आली. राज्यांना केंद्राचे गुलाम केले. राज्यांच्या पैशांवर मोदी सरकार वारेमाप उधळपट्टी करीत आहे. व्यापारी व छोट्या उद्योगांना छळण्यासाठी ‘जीएसटी’चा वापर करण्यात आला व हे उत्तम अर्थ आरोग्याचे लक्षण नाही. दबाव आणून रिझर्व्ह बँकेला हवा तसा निर्णय घ्यायला लावणारे मोदी सरकार देशाचा आर्थिक ढाचाच उद्ध्वस्त करीत आहे”, अशी टीकाही केली.

हेही वाचा >> महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”

“मोदी काळात रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता संपुष्टात आली. नोटाबंदीसारखे निर्णय घेताना रिझर्व्ह बँकेला पूर्णपणे अंधारात ठेवले गेले. मोदी यांनी मूठभर उद्योगपतींची १६ लाख कोटींची बँक थकबाकी एका झटक्यात माफ केली. हा निर्णय अर्थव्यवस्थेला दुबळे करणारा होता. १६ लाख कोटी हा आकडा लहान नाही, पण मोदींनी हे उद्योगपतींचे कर्ज माफ केले. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ते बोलायला तयार नाहीत. उद्योगपतींनी देशाची अर्थव्यवस्था बुडवली तर मोदी त्यांना सांभाळून घेतात, पण शेतकऱ्यांना मात्र तेच मोदी देशोधडीला लावतात”, असाही हल्लाबोल त्यांनी केला.

“मोदी यांना अर्थशास्त्रातले कळत नाही. त्यामुळेच ते अर्थविषयक निर्णय तुघलकी पद्धतीने घेतात. निर्मला सीतारामन या कणाहीन महिलेला देशाचे अर्थमंत्री केले. त्या महिलेचे पती परकला प्रभाकर अर्थविषयक तज्ज्ञ आहेत व मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचे त्यांचे मत आहे. मोदी शेतकऱ्यांच्या मालास हमीभाव देऊ शकले नाहीत. कांदा, दूध, कापूस, भाजी, द्राक्ष, धान्यास भाव नाही. पण मोदी यांचे उद्योगपती मित्र गौतम अदानी यांच्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवून त्यांचा आर्थिक लाभ केला जातो”, अशीही टीका राऊतांनी केली.

धारावी, मुंबईची मिठागरे, वांद्रे रेक्लमेशनच्या जमिनी अदानी यांना जवळ जवळ कवडीमोल भावातच दिल्या. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे धोरण मोदी यांनी आखले. हा विचार राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे, पण मोदी हे पेढीवरचे व्यापारी आहेत. देशाचे अर्थशास्त्र त्यांच्या आकलनापलीकडचे आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला वेठीस धरून देश लुटण्याचा जंगी उपक्रम सुरू आहे. पैशांची, अर्थव्यवस्थेची मक्तेदारी हेच मोदींचे अर्थशास्त्र आहे, असाही निशाणा त्यांनी साधला.

फोडा-झोडा आणि लोढा!

‘पैशांच्या जोरावर पक्ष फोडा व निवडणुकीच्या खर्चाला अदानी, लोढा’ असेच एकंदरीत चित्र आहे. फोडा-झोडा आणि लोढा! भाजपचे हेच चरित्र आता उघडे पडले आहे. वसुली रॅकेट चालवणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणा हे सध्याच्या अर्थव्यवस्थेचे खांब ठरले आहेत. तरीही कुणाला वाटत असेल की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. तर त्यांना आमचे साष्टांग दंडवत”, असं म्हणत त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला.