उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना राजकीय टोलेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांनी नाव न घेता अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंच्या आजारपणावर खोचक शब्दांत टोला लगावला. मात्र, आता त्यावरून कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेवर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना राऊतांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. यावेळी फडणवीसांच्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता त्यांनी त्यावर टोला लगावला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नाट्य परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी २०१९ साली कट्यार पाठीत घुसलीचा प्रयोग झाल्याची टीका केली. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा पाहिला की आपल्याला सिंहासन सिनेमाची आठवण होते, असंही फडणवीस म्हणाले. “ज्यांनी केवळ नाटकं केली, त्यांना लोक घरी बसवतात. महाराष्ट्रानं पाहिलं, २०१९ साली ‘कट्यार पाठीत घुसली’ प्रयोग झाला. मग २०२२ साली आम्हीही प्रयोग केला, ‘आत्ता होती गेली कुठे?’. त्यामुळे असे प्रयोग चालूच असतात. आम्हालाही परिस्थितीनुरूप नाटक किंवा चित्रपटांचं स्मरण होतं. जसं मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो. आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही. मी कुणाबाबत बोलतोय याबद्दल सांगण्याची आवश्यकताही नाही”, असं फडणवीस म्हणाले.

“मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा…”

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांच्या या टोल्यावर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देवेंद्र फडणवीसांना बोलू द्या. त्यांना २०२४ नंतर नाटकं, एकांकिका हेच करायचंय. दुसरं काम काय आहे त्यांना? मानेचा पट्टा एक आजार असतो. असे आजार अनेकांना होत असतात. अमित शाहाही आजारी असतात. मोदीही आजारी पडू शकतात. पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यातला दिल्लीच्या गुलामीचा पट्टा महाराष्ट्राला वेदना देणारा आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात पट्टा घातलेला आहे आणि दिल्ली तो पट्टा खेळवत बसली आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“…याबाबत श्रीमान फडणवीस यांना काहीच माहिती नाही?” ठाकरे गटाचा खोचक सवाल; मोदी-शाहांचाही केला उल्लेख!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीतील बैठकांवरून टोलेबाजी

दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठका दिल्लीत होण्यावरून सत्ताधाऱ्यांकडून खोचक टीका करण्यात आली होती. त्यावरूनही संजय राऊतांनी एकनाथ शिंदे व अजित पवारांना टोला लगावला आहे. “काँग्रेसचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यांना वारंवार एकेका जागेसाठी दिल्लीत जावं लागू नये, यासाठी आम्ही त्यांची सोय पाहातोय. जसं भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट यांचं हायकमांड दिल्लीत आहे. शिवसेनेचं हायकमांड मुंबईत आहे. आता शिंदे गटाचे हायकमांड अमित शाह आहेत, मोदी किंवा नड्डा आहेत. आता अजित पवारांबाबत महायुतीत चर्चा असेल तर त्यांना दिल्लीत अमित शाह, जे. पी. नड्डा, मोदींना भेटावं लागेल”, असं संजय राऊत म्हणाले.