scorecardresearch

“उद्या नाना पटोलेंच्या घरी धाड पडली तर…”; नागपुरातल्या ईडीच्या कारवाईवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई आता चिंतेचा नव्हे तर गमतीचा विषय झाला असल्याचंही राऊत म्हणाले आहेत.

Sanjay Raut PTI

नाना पटोले यांचे वकील सतिश उके यांच्यावर ईडीची कारवाई झाली आहे. त्यावरून आता संजय राऊतांनी भाजपावर टीका केली आहे. त्याचबरोबर ज्यांच्यावर आरोप केले जातात, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जे माहिती देतात त्यांच्यावर कारवाई केली जाते, असंही राऊत म्हणाले आहेत.


माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले,” ज्यांच्यावर आरोप केले जातायत, ज्यांच्याविषयी माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जे माहिती देतायत, त्यांच्यावर महाराष्ट्रात कारवाई होतेय. आता चिंतेचा विषय नाही, गमतीचा विषय आहे. आम्हीही माहिती दिलीये, पुरावे दिलेत. पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर केंद्रीय तपास यंत्रणा, पंतप्रधान कार्यालयाने कारवाई केलेली नाही. म्हणून म्हटलं हा गमतीचा विषय आहे, चिंतेचा नाही. आता नागपुरात नाना पटोलेंच्या वकिलांवर ईडीची धाड पडली. त्यामुळे भविष्यात नाना पटोलेवर धाडी पडल्या तरी काही वाटणार नाही.


संजय राऊत म्हणाले,”आमचे विरोधी पक्षातले नेते सांगतात की ‘कर नाही त्याला डर कशाला’. असं असेल तर मग आम्ही दिलेल्या पुराव्यांवर तुमच्या तपास यंत्रणा कारवाई का करत नाहीत? न्यायाचा तराजू चोरबाजारातला आहे. न्यायाचा तराजू सरळ नाहीये. कायदा सगळ्यांसाठी समान आहे. पण महाराष्ट्र आणि जिथे भाजपाचा मुख्यमंत्री नाहीत तिथे हा तराजू एका बाजूने झुकलेला आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून झुंडशाही आणि अराजक निर्माण करतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर जर कोणी पाळलेल्या गुंडांप्रमाणे करत असेल तर ती संघराज्य व्यवस्थेसाठी गंभीर बाब आहे”.

हेही वाचा – नागपुरात नाना पटोलेंच्या वकिलाच्या घरावर ईडीचा छापा; फडणवीसांविरोधात याचिका केल्याने आले होते चर्चेत

गरज नसल्याने भाजपाने एनडीए भंगारात काढली

एनडीएबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले,” आज या देशातून, देशाच्या राजकारणातून एनडीए पूर्णपणे संपलेलं आहे. जर २०२४ ला किंवा त्या आधी अशी परिस्थिती निर्माण झाली की भाजपाला पूर्ण बहुमत किंवा मिळालं नाही, तेव्हा एनडीए जन्माला येईल, तेव्हा त्यांना गरज लागेल. पण आज त्यांना गरज नसल्याने एनडीए भंगारात काढली. शिवसेना बाहेर पडली तेव्हाच एनडीए फुटली. काल मला अकाली दलाचे नेते सुखदीप बादल भेटले . त्यांनी एनडीएतून बाहेर पडलेल्या लोकांनी एकत्र यावं अशी भूमिका मांडली. मी आता मुंबईत चाललोय, तेव्हा उद्धव ठाकरेंशी बोलेन.

शरद पवारांनी युपीएचं अध्यक्ष व्हावं का?

संजय राऊत म्हणतात, “काँग्रेसचं अध्यक्षपद आणि युपीएचं अध्यक्षपद या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. काँग्रेसचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार हे ते कुटुंब, त्यांची वर्किंग कमिटी ठरवेल. हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. पण यूपीएच्या संदर्भात विरोधी पक्षाच्या नेतृत्वासाठी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन युपीएच्या मजबूतीसाठी पुढाकार घेतला नाही, इतर पक्षांना त्यात आणलं नाही. तर दुसरं कोणी पुढाकार घेणार असेल तर या देशातले सगळे भाजपाविरोधी प्रमुख पक्ष आणि मुख्यमंत्री त्यांचं नेतृत्व स्वीकारतील, असं चित्र मी सध्या पाहतोय. काँग्रेस यासंदर्भात पुढाकार घ्यायला तयार नाही असं दिसतंय. युपीए कोणाची खासगी जहागीर नाही. आता यूपीए आहे की नाही ही शंका आहे. जर २०२४ ची तयारी करायची असेल तर यूपीए मजबूत करावी लागेल. शरद पवार या सगळ्यात आघाडीवर आहेत. ते सगळ्या विरोधी पक्षांचे आधारस्तंभ आहेत, भीष्म पितामह आहेत. काँग्रेसकडून मला काही प्रयत्न झालेले दिसत नाहीत. पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने अधिक जबाबदारीने पुढे येऊन युपीएच्या जिर्णौद्धाराचे प्रयत्न करायला हवेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut on raid on nana patoles advocate in nagpur vsk

ताज्या बातम्या