संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. त्यानंतर राऊतांविरोधात विधिमंडळात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून हे प्रकरण राज्यसभेच्या सभापतींकडे वर्ग करण्यात आलं आहे. दरम्यान, संजय राऊत यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा – संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाचं प्रकरण राज्यसभेच्या सभापतीकडे वर्ग; खासदारकी जाणार?
काय म्हणाले संजय राऊत?
“ज्या लोकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, ते या हक्कभंग समितीत आहेत. ज्यांच्याविरोधात मी भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, ते त्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत. अशा समितीपुढे कोणालाही न्याय मिळू शकत नाही. मी काहीही चुकीचं बोललं नव्हतो, एका विशिष्ट गटापुरता माझा तो शब्द होता, ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेवर निवडून दिलं. त्या विधिमंडळाबाबत मी अपशब्द वापरू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
“खासदारकी रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू”
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधींप्रमाणे खासदारकी रद्द करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला. “ज्या प्रकारे राहुल गांधी यांच्याविरोधात अपात्रेची कारवाई करण्यात आली, त्याप्रमाणे माझी खासदारकी रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे”, असा दावाही त्यांनी केला.
शिंदे गटावर टीकास्र
पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटावरही टीकास्र सोडलं. “उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. बाकी सर्व धोतऱ्यांच्या बिया आहेत. त्या शिवसेनेबरोबर मी शेवटपर्यंत राहणार आहे. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – Video: “हिंमत असेल तर…” विधानसभेत कॅगचा अहवाल वाचणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज
नेमकं प्रकरण काय?
कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. महाराष्ट्रात विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असं ते म्हणाले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपाने यावर आक्षेप घेत, संजय राऊतांविरोधात हक्कभंगाच्या कारवाईची मागणी केली होती. या मागणीनंतर विधानसभा अध्यांनी यासंदर्भात संजय राऊतांना नोटीस पाठवली. या नोटीसीला उत्तर देताना माझ्या विरोधात हक्कभंग कारवाईची प्रक्रिया करणे हा विरोधकांचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच विधिमंडळाबद्दल मला सदैव आदर राहिला आहे. विधिमंडळाची अप्रतिष्ठा होईल असे कोणतेच विधान मी केले नाही, असेही ते म्हणाले होते.