राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीनं शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करण्याचा निर्णय एकमताने घेतल्यानंतर त्यावर आता शरद पवार काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. शरद पवारांची यासाठी मनधरणी करण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढ्या घडामोडी घडत असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी वेगळीच भीती बोलून दाखवली आहे.

शरद पवार राजीनामा मागे घेण्याची शक्यता?

शरद पवारांनी गुरुवारी पक्षातील कार्यकर्त्यांशी चर्चा करताना केलेल्या सूतक वक्तव्यावरून ते राजीनामा मागे घेणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “दोन दिवसांनंतर तुम्हाला आंदोलन करायची गरज पडणार नाही”, असं शरद पवार म्हणाले होते. त्यामुळे ते राजीनामा मागे घेण्याचा निर्णय घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

“काल संध्याकाळपर्यंत शरद पवार निर्णयावर ठाम होते, आता..”, जयंत पाटलांचा दावा; राजीनाम्याचं काय होणार?

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “ती त्यांच्या पक्षाची अंतर्गत व्यवस्था आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीने त्यांचा राजीनामा नामंजूर केला असेल तर ते योग्य आहे. तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. इतर सर्व विरोधी पक्षांप्रमाणेच आमच्या भावनाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवार अध्यक्षपदी नसले तर…

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिले नाहीत, तर त्याचा देशातील विरोधी पक्षांच्या आघाडीवर, विरोधकांची एकजूट करण्याच्या प्रयत्नांवर परिणाम होईल, असं संजय राऊत म्हणाले. “हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र तरी या घडामोडींमुळे विरोधी पक्षांच्या एकूण राजकारणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडी, उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांचं या घडामोडींकडे लक्ष राहील. शरद पवारांचं विरोधी पक्षांच्या आघाडीत महत्त्वाचं योगदान आहे. अशावेळी त्यांनी मुख्य प्रवाहात असायला हवं ही सगळ्यांची भूमिका आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

शरद पवारांचा राजीनामा समितीने फेटाळला, अध्यक्षपदाचा पेच कायम; धनंजय मुंडे म्हणतात, “पक्षातील लोकशाहीत…”

“जर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले नाहीत तर नक्कीच विरोधकांच्या आघाडीवर परिणाम होईल”, असंही राऊतांनी नमूद केलं. दरम्यान, हे सगळं पूर्वनियोजित असल्याच्या टीकेवर बोलताना संजय राऊतांनी “मला माहीत नाही, पण तसं नसावं”, अशी थोडक्यात प्रतिक्रिया दिली.