खासदार संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर पैशांची अफरातफरी केल्याचा आरोप केला होता. गिरणा अॅग्रो नावाने १७८ कोटी २५ लाखांचे शेअर्स दादा भुसेंनी शेतकऱ्यांकडून गोळा केल्याचं संजय राऊतांनी म्हणाले होते. दरम्यान, यासंदर्भात दादा भुसेंनी आज विधानसभेत स्पष्टीकरण दिले. यावेळी बोलतान त्यांनी संजय राऊत हे शरद पवारांची चाकरी करतात, अशी टीका केली. दरम्यान, दादा भुसेंनी केलेल्या टीकेला संजय राऊतांनी प्रत्त्युतर दिलं आहे. दिल्लीत टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले संजय राऊत?
दादा भुसेंच्या दाढीला आग लागण्याचं काहीही कारण नव्हतं. मी त्यांच्यावर कोणताही आरोप केला नव्हता. मी फक्त खुलासा मागितला आहे. याप्रकरणातील शेतकरीही त्यांना खुसाला मागत आहेत. दादा भुसे यांनी एक कोटी ७५ लाख रुपये जमा केले. मात्र, त्यांच्या वेबसाईटवर केवळ दीड कोटी रुपये फक्त ४७ शेतकऱ्यांच्या नावाने दाखवले आहेत. १ फेब्रुवारीपासून त्या भागातील शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना दादा भुसेंनी प्रश्न विचारावे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
हेही वाचा – “संजय राऊतांच्या मेंदूत आता…”; आनंदाचा शिधावाटपावरुन केलेल्या ‘त्या’ टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर
शिंदे गटाकडून राजीनाम्याची मागणी, राऊत म्हणाले….
दरम्यान, शिंदे गटाने केलेल्या राजीनाम्याच्या मागणीसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, मला शिंदे गटाच्या आमदारांनी निवडून दिलेलं नाही. मला शिवसेनेच्या आमदारांनी निवडून दिले आहे. मुळात त्यांना कोणी निवडून दिलं? असा प्रश्न विचारायला हवा. त्यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मंत्री केलं. त्यांनी आता परत निवडून येऊन दाखवावे. मी पहिल्यांदा खासदार झालेलो नाही. ही माझी चौथी वेळ आहे. तेव्हा मला त्यांनी शहाणपणा शिकवू नये, असे ते म्हणाले.