राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. अनेक मंत्र्यांकडे पाच-पाच, सहा-सहा जिल्ह्यांची जबादारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या केवळ चर्चा ऐकायला मिळत आहेत. परंतु अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटातल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. या सर्व बाबींवर आज (३१ मे) शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं.
खासदार संजय राऊत म्हणाले, राज्य सरकारमधले लोक चिंतेत आहेत. राज्य सरकारला भिती आहे. हे सरकार पडण्याची त्यांना चिंता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे चेहरे बघा, सतत तणावात असतात. कारण हे झोपतच नाहीत. झोपच उडाली आहे यांची. चेहरे बघा त्यांचे. मला दया येते यांची, एक माणूस म्हणून मला काळजी वाटते, माणुसकी म्हणून चिंता वाटते, कारण ते सतत चिंतेत असतात.




हे ही वाचा >> “खरी शिवसेना शिंदेंची, ठाकरे गट कोणता वर्धापन दिन साजरा करणार?” भाजपाच्या प्रश्नावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
संजय राऊत म्हणाले, देवेंद्रजींचा चेहरा बघा, कसा ओढलेला आणि तणावग्रस्त असतो. कारण झोपत नाहीत, सतत तळमळत असतात, तडफडत असतात, उद्याच्या भविष्याच्या चिंतेने तडफडत असतात हे स्पष्ट दिसतंय त्यांच्या चेहऱ्यावर. मला चिंता वाटते, फडणवीसांनी त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे. ही रात्रीची जागरणं, पहाटेपर्यंत जागं राहणं, वेषांतर करून बाहेर जाणं, हे सगळं थांबवलं पाहिजे.