Sanjay Raut on Non Vegetarian diet row in Maharashtra : मांसाहारावरून होत असलेल्या टीकेला खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी दिंडोरीतील सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं. “मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो”, असं वक्तव्य सुळे यांनी केलं. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. वारकरी संप्रदाय त्यांना उत्तर देईल.” फडणवीसांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “कोणीही कोणाचंही खाणं काढू नये. फडणवीस चोरून काय खातात ते आम्ही काढू का?”
संजय राऊत म्हणाले, “सुप्रिया सुळे यांच्या मांसाहारावर कोणी आक्षेप घेतला आहे? जर कोणी टीका करत असेल तर त्यांना करू द्या. कारण त्या लोकांना (सत्ताधारी) कुठल्याही गोष्टीवर टीका करण्याशिवाय दुसरं येतं तरी काय? या महाराष्ट्रात मटण खायला बंदी आहे का? कोणी महाराष्ट्रातील मराठा धर्म नष्ट केला आहे का? तसं असेल तर सांगा. कोणी काय खावं, काय नाही ते तुम्ही ठरवू शकत नाही. तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही देखील खा.”
…त्यांच्यामुळे मटण-चिकण महाग झालंय : संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या, ‘वारकरी संप्रदाय उत्तर देईल’ या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते आम्हाला माहिती आहे. फडणवीस शाकाहारी आहेत का? ते काय खातात ते आम्हाला माहिती नाही का? उगाच कशाला कोणाच्याही खाण्यावर जाता? स्वतः काय खाता ते सर्वांना माहिती आहे. आज बाजारात मटण चिकण का इतकं महाग झालंय? आम्ही मटण-चिकण खातो म्हणून ते महागलं नाहीये. उलट जे लोक कालपर्यंत खात नव्हते तेच आज बाजारात रांगा लागून मटण-चिकण घेत आहेत त्यामुळे मटण-चिकण महाग झालं आहे.”
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी ‘राम कृष्ण हरी’वाली आहे. मी केवळ गळ्यात तुळशीची माळ घातलेली नाही एवढाच फरक आहे. कारण मी कधीकधी मांसाहार करते. मी इतरांसारखं खोटं बोलत नाही, खाते तर खाते आणि मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं. मग तुम्हाला काय अडचण आहे? “माझे आई-वडील, सासू-सासरे, माझा नवरा देखील मटण खातो. आम्ही आमच्या पैशाने खातो. यात इतरांना अडचण असण्याचं कारण नाही. आम्ही काही उधारीवर आणून खात नाही. आपण कोणाला मिंधे नाही. जो है वह डंके की चोट पे हैं, तो दिल खोल के करो. आम्ही मटन खातो तर खातो.”