विश्वासदर्शक ठरावाविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार – संजय राऊत

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विश्वासदर्शक ठरावासंदर्भात दिलेल्या आदेशांविरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

Sanjay Raut
(फोटो सौजन्य – PTI)

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील अंतर्गत कलह आता थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. मंगळवारी संध्याकाळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन अल्पमतात आलेल्या राज्य सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती करणारं पत्र सादर केलं. त्यापाठोपाठ आज सकाळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी राज्य सरकारला ३० जुलै अर्थात गुरुवारी बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन पाचारण केल्याचं पत्र व्हायरल झालं. आता उद्धव ठाकरे सरकार बहुमत चाचणीला सामोरं जाणार की उद्धव ठाकरे थेट राजीनामा देणार? असा प्रश्न उपस्थित केला जात असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

“राज्यपाल याच क्षणाची वाट पाहात होते”

“१२ राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अडीच वर्षांपासून प्रलंबित आहे. पण राज्यपाल याच क्षणाची वाट पाहात होते. आमच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ११ तारखेपर्यंत त्यावर निर्णय होणार नाही. यादरम्यान असं काही घडलं, तर सर्वोच्च न्यायालयाने दाद मागण्याची मुभा दिली आहे. अशात राजभवन आणि भाजपा मिळून संविधानाच्या चिंधड्या उडवत असेल, तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागेल. आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत”, असं सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज्यपालांवर देखील टीका केली आहे.

भाजपाला खोचक टोला

दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर घडलेल्या वेगवान घडामोडींवर संजय राऊतांनी खोचक टोला लगावला आहे. “राफेलचा वेगही इथे कमी पडेल इतक्या वेगाने घडामोडी घडत आहेत. भाजपा हे सगळं करतेय याचा अर्थ त्या बंडखोरांना तोडण्यात भाजपाचाही हात असणारच. असं तुम्ही करत असाल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. जनता सगळं बघतेय. जनता शांत बसणार नाही”, असं राऊत म्हणाले.

“राज्यपालांवर देखील दबाव असू शकतो”

“अडीच वर्षांपासून आम्ही एक फाईल पाठवली आहे. पण तुम्ही सरकार अस्थिर व्हायची वाट पाहात होतात. तुम्ही हे सरकार पडल्यानंतर किंवा पाडल्यानंतर कुणालातरी या १२ जागा गिफ्ट देणार आहात. पण आपल्या राज्यपालांवर देखील कुणाचातरी दबाव असू शकतो. त्यामुळे मी फार काही बोलणार नाही”, असं देखील संजय राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

उद्या ठाकरे सरकारची परीक्षा: राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव

“आमच्या दृष्टीने हे १६ आमदार अपात्र झाले आहेत”

“महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याच्या पहिल्या दिवसापासून भाजपाची भूमिका सरकार पाडण्याचीच राहिली आहे. त्यांना स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आल्याचं वाटत असले, तर त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. असं अधिवेशन बोलवता येईल का? हा पहिला प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यासंदर्भात निर्णय होत नाही, तोपर्यंत अधिवेशन बोलावण्यात अर्थ नाही. आमच्या दृष्टीने हे १६ आमदार अपात्र झाले आहेत. आम्ही कायद्याने बोलतो.देशातल्या सर्वच राजकीय नेत्यांशी आमची चर्चा सुरू आहे. सगळ्यांनाच असं वाटतंय की हे घटनाबाह्य कृत्य होतं”, असंही राऊत म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanjay raut shivsena targets governor bhagatsingh koshyari no confidence motion pmw

Next Story
उद्या ठाकरे सरकारची परीक्षा: राज्यपाल कोश्यारींनी बोलावलं विशेष अधिवेशन; उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी