शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राजीनामा देऊन वरळीतून माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान दिले होते. शिंदे गटाकडून या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने हाच विषय लावून धरला. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी देखील यावर शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोळी समाजातर्फे नागरी सत्कार करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन वरळीत जावे, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.
माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत म्हणाले की, आदित्य ठाकरे या ३२ वर्षांच्या तरुण नेत्याने सरकारला आव्हान दिले. त्या आव्हानानंतर जे काय राजकीय भूकंप घडायला सुरुवात झाली आहे, ती अत्यंत मजेशीर आहे. आज वरळीत मुख्यमंत्री एकटे येत नसून जोडीला गृहमंत्र्यांना घेऊन येत आहेत. म्हणजे पाहा म्हणजे किती गांभीर्याने घेतले आहे. आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर आम्ही ठाम आहोत. मुख्यमंत्री यांनी खरं म्हणजे राजीनामा देऊन वरळीत यायला हवे होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही लवाजमा घेऊन येणार, तुमचे हजार बाराशे पोलिसच खुर्च्या अडवून बसणार.
३२ वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरलं
“वर्ध्यात ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील पोलिसांनी साहित्य संमेलनाचे बुजूर्ग अध्यक्ष माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनाच अडवलं. त्यांना कार्यक्रम स्थळी जाऊ दिले नाही, अशी यांची यंत्रणा आहे. वरळीतही पोलिसच कोळ्यांच्या वेषात येऊन खुर्च्यावर बसतील असे वाटते. आम्ही आदित्य ठाकरेंच्या आव्हानावर कायम आहोत. आम्ही संध्याकाळपर्यंत वाट बघू की ते राजीनामा देतायत की मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पोलिसांच्या फौजफाट्यासह येतायत. ३२ वर्षांच्या तरुणाला राज्य सरकार कसं घाबरलं, हे आज वरळीत दिसत आहे.”, अशी टीका संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.
मोदी सेना आज वरळीत येणार
वरळी विधानसभेच्या निवडणुकीवरुन आदित्य ठाकरेंनीच राजीनामा द्यावा, असा सल्ला भाजपाकडून देण्यात आला होता. याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, “भारतीय जनता पक्षाला मध्ये पडण्याची गरज नाही, याला मराठीत चोमडेपणा म्हणतात. स्वतः मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही मोदींची माणसे आहोत. त्यामुळे मोदी सेनाच आज वरळीत येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या कवचकुंडलात मोदी सेना येणार असल्यामुळे भाजपाने चोमडेपणा करणे अपेक्षित आहे.”