दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गट व ठाकरे गटाकडून दोन स्वतंत्र मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांमध्ये एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आता या मेळाव्यात दोन्ही बाजूंनी झालेल्या भाषणांवर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर आता ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी टीकास्र सोडलं आहे. “भाजपासमोर एकनाथ शिंदेंनी गुडघे टेकले आहेत, पुढे हे सगळे भाजपातच जातील”, असं संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले आहेत.

“सभा शिवसेनेची, म्हणतायत भाजपाला मजबूत करा”

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपाला मजबूत करा म्हणत होते, असं संजय राऊत म्हणाले आहेत. “यांनी भाजपाच्या समोर एवढे गुडघे टेकत आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी नेहमीच देशाचं, जनतेचं, महाराष्ट्राचं म्हणणं मांडलं. पण हे मेळाव्यात म्हणतात भाजपाला मजबूत करा, मोदींना मजबूत करा, नड्डांना मजबूत करा, फडणवीसांना मजबूत करा. शिवसेनेची सभा होती ना तुमची? भाजपाने पाठवलेल्या भाड्याच्या लोकांसमोर तर त्यांना मोदींचा विजय असो, अमित शाहांचा विजय असो हेच म्हणावं लागेल”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.

“…तर महाराष्ट्रात आग लागेल”

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणार असल्याचं ठामपणे आश्वासन मेळाव्यात दिलं. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मराठा आरक्षण द्यावंच लागेल. उपकार करताय का? नाहीतर महाराष्ट्रात आग लागेल. तुम्हाला कुणीही विचारणार नाही. तुम्ही कुणाच्या मेहेरबानीनं मुख्यमंत्री झालात, का झालात हे सगळ्यांना माहिती आहे. जोपर्यंत तुम्हाला तिथे बसवलंय, तोपर्यंत तुम्हाला हे काम करावंच लागेल”.

“…तेव्हापासून खोट्या शपथा घ्यायला लागले”

दरम्यान, एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्याच्या भाषणात छत्रपती शिवरायांची शपथ घेतल्यावरूनही संजय राऊतांनी हल्लाबोल केला. “भाजपाच्या सहवासात आल्यापासून खोट्या शपथा घेण्याचं प्रमाण वाढलंय. २०१४ साली म्हणत होते शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदींबरोबर आहे. तेव्हापासून शिवरायांचं नाव राजकारणात वापरण्याची प्रथा सुरू झाली आहे. शपथा कसल्या घेताय तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करायची, महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसायचा, मराठी माणसाच्या एकजुटीला तडा द्यायचा आणि वर छत्रपतींची शपथ घ्यायची? हे सगळं भाजपाच्या इशाऱ्यावर चाललंय”, असा आरोप संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर केला आहे.

“…त्यांनी निर्लजाप्रमाणे माझ्याकडे पैसे मागितले”; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर आरोप, भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

“यांना स्वत:चा आचार-विचार नाहीये. जे भाजपा सांगेल तेच. काही दिवसांनी हे डोक्यावर काळ्या टोप्या घालून फिरतील. शिंदे गटाला भाजपामध्ये जावं लागेल. म्हणे रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत वगैरे. शेवटचा थेंब असेपर्यंत हे शिवसेनेत राहणार होते. राहिले का? भाजपा आमचा छळ करतंय सांगत जाहीर सभेत राजीनामा देणारे हे. आता भाजपानंच त्यांना मांडीवर घेतलंय”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

“हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा”

“तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा. तुम्ही मुख्यमंत्री राहणार नाहीत तेव्हा अशी सभा घेऊन दाखवा. आम्हाला न्यायालयाचाही निर्णय नकोय. गरज नाही आम्हाला त्याची. जनतेच्या न्यायालयात चला. निवडणूक घ्या. तिथे ठरेल कोणती शिवसेना खरी आणि कोणती खोटी ते”, असंही राऊत म्हणाले.