वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आलेल्या नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला असल्याची चर्चा चालू आहे. मलिक हे गुरुवारी (७ डिसेंबर) विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत सत्ताधारी बाकावर जाऊन बसले होते. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा अडचणीत सापडली आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीसह सत्तेत असताना फडणवीस यांच्यासह भाजपाने नवाब मलिक यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले होते. त्यानंतर मलिक यांना तुरुंगात जावं लागलं होतं. अशातच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवून महायुतीत प्रवेश केल्याच्या चर्चेमुळे शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक प्रकरणावर नाराजी व्यक्त करत अजित पवार यांना एक पत्रदेखील लिहिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. ज्या आरोपांखाली ते तुरुंगात गेले, ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, असं आमचं मत आहे. नवाब मलिक हे सध्या केवळ वैद्यकीय कारणांमुळे जामीन मिळून तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण (अजित पवार गटाने) त्यांचं स्वागत करावं. परंतु, अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणं योग्य नाही.
हे ही वाचा >> “आम्ही त्यांच्याशी कुठलीही…”, नवाब मलिकांवरून महायुतीतल्या कथित मतभेदांनंतर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण; म्हणाले…
देवेंद्र फडणवीस यांच्या या पत्रावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाने या पत्रावरून फडणवीस यांना टोला लगावला आहे. ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांचं हे पत्र मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर रिपोस्ट करत म्हटलं आहे, “अरे बापरे! सत्तेपेक्षा देश महत्वाचा अशी एकदम नवी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला हे माहीतच नव्हतं. त्यांच्या देशात हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सिंचन घोटाळा फेम अजित पवार, ईडी फेम भावना गवळी, प्रताप सरनाईक, मुलुंडचे ना## पोपटलाल यांना मानाचे स्थान आहे. यांचा देश हा असा आहे! हल्ला फक्त मलिक यांच्यावर, बाकीचे यांच्या मांडीवर! पिते दूध डोळे मिटूनी…जात मांजराची…”