विधीमंडळाच्या अधिवेशनावेळी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. नवाब मलिक यांच्यावर भाजपाने देशद्रोहासह अनेक आरोप केले होते. याप्रकरणी ते तुरुंगातही जाऊन आले आहेत. ते सध्या वैद्यकीय कारणांमुळे जामीनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. अशातच ते आज भाजपा, शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या आमदारांबरोबर सत्ताधारी बाकावर बसले. नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे विधान परिषदेत शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाला धारेवर धरत अनेक प्रश्न उपस्थित केले.

नवाब मलिक यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपा अडचणीत सपडली आहे. त्यामुळे भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना एक पत्र लिहून नवाब मलिक यांना महायुतीत घेता येणार नाही असं म्हटलं आहे.

फडणवीस यांच्या पत्रानंतर शिवसेनेच्या शिंदे गटानेही कडक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप असून त्यांना अटक झालेली असतानाही ते विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही नवाब मलिक यांना स्वीकारलं अशी भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे. त्यांना आपल्या पक्षात घेण्याबाबतचा निर्णय अजित पवारांचा असला तरी त्यांच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं होता कामा नये.

नवाब मलिक प्रकरणावरून फडणवीस यांचं पत्र आणि शिंदे गटाची भूमिका पाहता महायुतीत मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे. तटकरे यांनी म्हटलं आहे की, आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. परंतु, आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणं स्वाभाविक आहे.

हे ही वाचा >> नवाब मलिकांवरून महायुतीत मतभेद? फडणवीसांच्या पत्रापाठोपाठ शिंदे गटानेही सुनावलं; म्हणाले, “अजित पवारांमुळे…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुनील तटकरे यांच्या या पोस्टनंतरही नवाब मलिक कोणत्या गटात आहेत याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. दुसऱ्या बाजूला, मलिक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे, असं वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.