Sanjay Raut on Raj Thackeray: मराठी भाषेच्या आग्रहावरून हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. याबद्दल शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी महायुती सरकारला प्रतिआव्हान दिले. तसेच काल रायगड येथे झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख करत त्यांनी सरकारला लक्ष्य केले. “मराठी भाषे संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखाडायचे आहे ते उखाडा”, असे आव्हान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले.
तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागाल
संजय राऊत पुढे म्हणाले, “हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस. हे राज्य मराठी माणसाचे आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या पूर्वजांनी तसेच १०६ हुतात्म्यांनी येथे बलिदान दिले आहे. तुम्ही बलिदान दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राजाचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात. तुमचे मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार, हे आम्हाला माहिती आहे.”
मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर आम्ही होणार. तुम्ही मोरारजी देसाई होण्याचा प्रयत्न करत आहात का? मराठीचा आग्रह धरला म्हणून तुम्ही गोळ्या घालणार का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरलेला नाही. तुमच्या घरात (गुजरात) आधी हिंदी सक्ती करा आणि मग इकडे हिंदी आणा, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
राज ठाकरेंच्या भाषणाचा उल्लेख करत म्हणाले…
राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणात गुजरातमधील अल्पेश ठाकूरचे उदाहरण दिले होते. २० लाख उत्तर भारतीयांना गुजरातमधून हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला भाजपाने आमदार केले आहे. हा मुद्दा संजय राऊत यांनी पुन्हा अधोरेखित केला. तसेच राज ठाकरे यांनी म्हटले होती की, मी आधी गुजराती आहे. याच विधानाचा आधार घेत संजय राऊत म्हणाले की, आम्हीही आधी मराठीच आहोत.
५० खोक्याची घोषणा देणाऱ्याला भाजपात प्रवेश
देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची निर्मिती खोक्यातून झाली. आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘५० खोके, एकदम ओके’ ही घोषणा दिली होती. विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना आमदार कैलास गोरंट्याल यांनी ही घोषणा दिली होती. आज त्यानांच फडणवीस यांनी पक्षात घेतले आहे, अशीही टीका संजय राऊत यांनी केली.