शिवसेनेतील बंडाळीनंतर राज्यात भाजपाच्या पाठिंब्यावर शिंदे गटाचं नवीन सरकार अस्तित्वात आलं. ४० आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता नेमकं शिवसेनेत काय बिनसलं? यावर या बंडखोर आमदारांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची अरेरावी, हिंदुत्व आणि संजय राऊत हे मुद्दे शिवसेना सोडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचं या आमदारांकडून सांगितलं जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून काही बंडखोर आमदारांनी संजय राऊतांमुळेच शिवसेना सोडल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, त्यांनी बंडखोर आमदार आणि त्यांच्या नेतेमंडळींना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक सल्ला देखील दिला आहे.

“त्यांनी एक काहीतरी ठरवावं”

शिवसेना सोडण्यासाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याचं सांगणाऱ्या आमदारांनी नंतर हिंदुत्वाचं कारण पुढे केलं. आता संजय राऊतांमुळे शिवसेना सोडल्याचा दावा काही आमदार करत असताना राऊतांनी त्यांना खोचक टोला लगावला आहे. “मुंबईतून पलायन करताना ते म्हणत होते की हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी सांगितलं की राष्ट्रवादी पक्ष निधी देत नव्हता म्हणून बाहेर पडलो. तिसऱ्या वेळी त्यांनी पक्षातले काही लोक आमच्या विभागात हस्तक्षेप करत होते म्हणून बाहेर पडल्याचं सांगितलं. आता चौथ्या वेळा ते माझं नाव घेत आहेत. नेमका त्यांनी पक्ष का सोडला, त्यांनी हे पाऊल का उचललं? याविषयी त्यांनी स्वत:ची कार्यशाळा घेतली पाहिजे. आजही ते आमचे आहेत. आजही आम्ही एका नात्याने बांधले गेलो आहोत. पण नेमकं कारण ठरवा. गोंधळून जाऊ नका. तुम्ही एकदा ठरवा की तुम्ही नेमके का गेले आहात”, असं राऊत म्हणाले.

“संदिपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलं होतं, हवं तर व्हिडीओ फूटेज काढतो”, संजय राऊतांचं टीकास्त्र

“हे ४० लोक सोडून गेले, त्यांच्यामुळे शिवसेनेचा एक कवचा देखील उडालेला नाही. शिवसेना जमिनीवर आहे. भविष्यात जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा हा मतदार आणि जनता शिवसेनेच्या पाठिशी ठामपणे उभी राहील”, असा निर्धार संजय राऊतांनी व्यक्त केला आहे.

“मी कधीच सरकारी कामात पडलो नाही”

“जर तुम्ही हिंदुत्वासाठी गेले असाल, तर २०१४ साली भाजपाशिवाय आपण हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आलो होतो. आमचं हिंदुत्व मजबूत असतानाही ज्या भाजपानं आमची युती तोडली, तेव्हा यातले कुणीच लोक काही बोलले नाहीत. २०१९ साली याच हिंदुत्ववादी भाजपानं हिंदुत्ववादी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवला म्हणून आमच्यावर ही वेळ आली. तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? या लोकांची कार्यशाळा त्यांच्या प्रमुखांनी घेतली पाहिजे आणि नेमकं कारण कोणतं याविषयी त्यांनी एकमत दिलं पाहिजे”, असं राऊत म्हणाले. “मी स्वत: कधीही सरकारी कामात पडलो नाही. संघटनेच्या कामातच मी आहे. पक्षाची भूमिका मांडतो. मुख्यमंत्र्यांच्या आसपास तुम्ही फार क्वचित मला पाहिलं असेल. मंत्रालय, इतर सार्वजनिक जागांवर संजय राऊत तुम्हाला कधीच दिसणार नाही”, असा दावा देखी राऊतांनी यावेळी केला.

Maharashtra Latest News Live : राष्ट्रपतीपदासाठी भाजपाच्या उमेदवाराला शिवसेना खासदारांचा वाढता पाठिंबा; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“संजय राठोड यांच्यावरच्या संकटात उद्धव ठाकरे कसे ठामपणे उभे राहिले, हे सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे. जे बोलत आहेत, त्यांना बोलू द्यात. आमचं मन साफ आहे. संदीपान भुमरे जेव्हा मंत्री झाले, तेव्हा सामना कार्यालयात येऊन प्रेमानं त्यांनी लोटांगण घातलं माझ्यासमोर. साहेब तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो असं म्हणाले. हवं तर त्याचं व्हिडीओ फुटेज काढायला लावतो. सगळं आहे”, असंही राऊत म्हणाले.