Sanjay Raut on CM Devendra Fadnavis: राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या विषयावर वाद सुरू आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी आग्रही असलेले सरकारमधील काही नेते उघडपणे एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. याबद्दल आज शिवसेनेचे (ठाकरे) नेते संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले. अर्थात त्यांनी उपरोधिकपणे ही टीका केली.
राज्यातील सर्व प्रश्न, पक्ष-सरकार आणि कॅबिनेटमधीलही प्रश्न सोडवण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत, असे संजय राऊत म्हणाले. पुढे मंत्र्यांमध्येच सुरू असलेल्या रस्सीखेच प्रकरणावर बोलताना ते म्हणाले, “मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. मंत्रिमंडळात एक दिवस गँगवॉर होईल. मी वारंवार हे सांगत आहे. हे बोलल्यानंतर मला माओवादी ठरविण्याचा प्रयत्न झाला.”
राज्याचे मंत्री छगन भुजबळ म्हणत आहेत की, आरक्षणाच्या विषयावरून अराजक निर्माण होईल. हे सांगणे सुद्धा माओवादच आहे. मग जनसुरक्षा कायद्याखाली भुजबळांवर कारवाई करणार का?, असाही सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
फडवणवीसांनी पंतप्रधान मोदींसारखे पत्रकार परिषदेला घाबरू नये
मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत समाजात गोंधळ आहे. दोन्ही समाजाच्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर द्यावे. फक्त जाता येता माध्यमांशी बोलताना ते एखाद-दुसरी प्रतिक्रिया देतात. त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी आणि याला सविस्तर उत्तर द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे पत्रकार परिषदेला त्यांनी घाबरू नये. वाटल्यास त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांनाही एकत्र बसवावे, असा सल्ला राऊत यांनी दिला.
आज प्रत्येक समाज अशांत आणि अस्वस्थ आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान नेता असताना त्यांनी या दोन्ही समाजांची समजूत काढली पाहीजे, असेही संजय राऊत म्हणाले.