खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्यांना अपात्र ठरवण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली आहे असं शिवसेना आमदार संजय शीरसाठ यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनीही यासंदर्भातले संकेत दिले आहेत. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदेंनी यासाठी २ हजार कोटींची डील केली असा आरोप केला. तसंच एकनाथ शिंदे यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आता शिवसेना नेते संजय शीरसाठ आणि प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांना अपात्र ठरवण्यासाठी तयारी सुरू आहे असं म्हटलं आहे.
भरत गोगावले यांनी काय म्हटलं आहे?
संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हेही दाखल झाले आहे. ते जे काही आरोप आमच्यावर करत आहेत त्यांच्या तोंडाला लगाम राहिलेला नाही. त्यामुळे आता त्यांना अपात्र ठरवण्यासाठी आमची तयारी सुरू आहे. आमच्या बैठकीत त्याविषयी चर्चाही झाली. संजय राऊत हे जे काही बोलत आहेत ते चांगलं आहे कारण ते उद्धव ठाकरेंना संपवण्याचंच काम करत आहेत. त्यांचं बोलणं त्यांना लखलाभ असंही गोगावले यांनी म्हटलं आहे. आम्ही लवकरच सगळ्यांना व्हिप लागू करणार आहोत. ५६ आमदारांनी त्याचं पालन करावं ते पालन केलं नाही तर आम्ही योग्य ती कारवाई करू असंही गोगावले यांनी म्हटलं आहे.
संजय शिरसाट यांनी काय म्हटलं आहे?
आमच्या बैठकीत अधिवेशनाची चर्चा झाली. शिवसेनेच्या सर्व ५६ आमदारांना व्हिप लागू केला जाणार आहे. त्या व्हिपचं पालन सगळ्यांनी करणं आवश्यक असणार आहे. जे व्हिप स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसंच संजय राऊत हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह बोलत आहेत त्यांना अपात्र कसं ठरवलं जाईल याची चर्चा आम्ही केली. त्यानुसार आम्ही लवकरच तसा निर्णय करू असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आमची लढाई शिवसेना भवन बळकावं किंवा पक्ष निधी बळकावणं यासाठी लढा दिला नाही. शिवसेना भवनावर आम्ही दावा करणार नाही कारण ते आमच्यासाठी मंदिर आहे. अनेकांना ती प्रॉपर्टी वाटत असेल पण आमच्यासाठी ते मंदिर आहे. शिवसैनिकांना पाळीव कुत्रा म्हणणारे लोकांना ती प्रॉपर्टी वाटते आहे असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय राऊतच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यातूनच २ हजार कोटींचे आरोप त्यांनी केलं आहे. त्यांना हे माहित नाही की शिवसेना हे नाव आम्हाला दिलंय. त्यामुळे संजय राऊत अपात्र कसं ठरतील हे आम्ही पाहणार आहोत असंही संजय शिरसाट असं म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?
माझ्यावर आत्तापर्यंत ३२ गुन्हे दाखल झाले आहेत. तरीही मागे हटणार नाही. मी शिवसेनेसोबत आहे आणि उद्धव ठाकरेंसोबत आहे. आज जे सरकार आहे ते उद्या असेल याची खात्री नाही. त्यामुळे मला गुन्हे दाखल झाल्याची पर्वा नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.