scorecardresearch

“ठाकरे गटाचे ५० जण आले अन् मी एकटाच…”  संतोष तेलवणे यांनी सांगितली शिवसेना-शिंदे गटातील राड्याची संपूर्ण घटना

गणपती विसर्जन मिरवणुकीत शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बाचाबाचीचं रुपांतर आता हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये या दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

“ठाकरे गटाचे ५० जण आले अन् मी एकटाच…”  संतोष तेलवणे यांनी सांगितली शिवसेना-शिंदे गटातील राड्याची संपूर्ण घटना
शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान प्रभादेवीत शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाली होती. या बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं आहे. शनिवारी मध्यरात्री दादरमध्ये शिंदे गट आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा झाला. यावेळेस शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात हवेत गोळीबार केला, असा आरोपही शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे. मात्र, सरवणकर यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. घरगुती वादातून भांडण झालं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय. मात्र, शनिवारी मध्यरात्री नेमकं काय झाल याबाबत शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी टीव्ही ९ शी बोलताना माहिती दिली आहे.

“काल रात्री मी माझ्या बिल्डिंगखाली उभा होतो तेव्हा उद्धव ठाकरे गटाचे ५० जण आले. तेव्हा मी एकटाच होतो. आले आणि म्हणाले बोल आता काय बोलतो?” पण मीसुद्धा या ५० जणांना पुरुन उरलो. मी त्यांना म्हणालो तुम्हाला हात लावायचा असेल हात लावा मला ठार मारा. जिवंत ठेवलात तर तुम्हा ऐकेकाला घरातून उचलून नेईन. मला केवळ उद्धव ठाकरेंचं वाईट वाटतं. पूर्वीची शिवसेना आता राहिली नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांनी चाललेललो शिवसैनिक आहोत त्यामुळे आमच्यात हिंमत आली आहे”, असेही तेलवणे म्हणाले. गणपती विसर्जनावेळी आमची मिरवणूक चांगली झाली. आमच्या मिरवणुकीपुढे ठाकरे गट फिका पडला. त्यामुळे ही मारहाण केली गेली,असं संतोष तेलवणे यांनी म्हटलं.

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याच्या आरोपावर तेलवणे म्हणाले की, गोळीबार हा वाघावर होतो, शेळ्यांवर नाही. पोलीसस्थानकात कोणताही गोळीबार झाला नाही. अटक करण्यासाठी आणि प्रकरण वाढवण्यासाठी ही खोटी बातमी पसरवली जात असल्याचे तेलवणे म्हणाले.

पाच शिवसैनिकांना अटक

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरुन २५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ शिवसैनिकांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे प्रकरण?

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. या स्वागत कक्षावरुन एकमेकांना डिवचण्यात आलं होतं. एकमेकांविरोधात जोरादर घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या दिवशी रात्री झालेल्या या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं होतं. शनिवारी मध्यरात्री शिंदे गटाचे संतोष तेलवणे यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्जही करावा लागला होता.

दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दादर पोलीस स्थानकात गोळीबार केला, असा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केला आहे. तर सदा सरवणकर यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. घरगुती वादातून भांडण झालं, असं सदा सरवणकर यांनी म्हटलंय.

संतोष तेलवणे यांच्याकडून फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. ‘आवाज करणार…तर…ठोकणारच…आज पेग्विन सेनेला…स्वतःची लायकी समजलीच असेल..’ असं म्हणत संतोष तेलवणे यांनी फेसबकुवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता.

राज्यात सत्ता संघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. खरी शिवसेना कुणाची, यावरुन घमासान सुरु आहे. प्रभादेवीमध्ये त्याचे पडसाद उमटले होते. सोशल मीडियातही शिंदे गट विरुद्ध शिवसैनिक हा वाद आता टोकाला गेला आहे. याच वादातून राजकीय राड्याला सुरुवात झाल्याचं यानिमित्ताने पाहायला मिळतंय. प्रभादेवी झालेल्या वादाचं हाणामारीत रुपांतर झाल्यानंतर आता राजकीय वातावरणही ढवळून निघालंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Santosh telvane on shinde group and shivsena workers clash dpj

ताज्या बातम्या