साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाल्याचं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला होता. खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातऱ्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपाने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. विशेष म्हणजे धक्कादायकपणे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे.
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाला आहे. कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केलं नाही हे लोकांनी दाखवून दिलं आहे. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालं आहे”. यावेळी शरद पवार यांनी आपण साताऱ्याला जाऊन आपण जनतेचे आभार मानणार आहोत असं सांगितलं.
“श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदेचे सदस्य होते. एका राज्याचं राज्यपाल पद त्यांनी सांभाळलं म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सातारच्या जनतेने चांगल्या मतांनी त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सातारकरांचा आभारी आहे,” असंही शरद पवार म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “२२० पार हे लोकांनी स्वीकारलेलं नाही. जो काही निर्णय लोकांनी दिला तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विनम्रपणे स्वीकारतो आहे. या निवडणुकीत आघाडीने चांगलं यश मिळवलं. सत्तेचा उन्माद लोकांना पसंत पडलेला नाही. जमिनीवर पाय ठेवून काम करण्याची अपेक्षा असते. त्यापेक्षा वेगळी भूमिका घेतली तर लोक स्वागत करतातच असं नाही, तेच या निवडणुकीत दिसून आलं”.
“काही लोकांनी टोकाची मतं मांडण्याची सीमाही ओलांडली होती. योग्य वेळी त्याबद्दल बोलेन. या निवडणुकीत एक गोष्ट आम्हाला बघायला मिळाली की पक्ष सोडून गेलेल्यांना जनतेने कौल दिला नाही. जे पक्ष सोडून गेले त्यांच्याबाबत लोकांचा निर्णय अनुकूल नव्हता. प्राथमिकदृष्टय्या हेच दिसून येत आहे,” असंही शरद पवार यांनी सांगितलं.