महाराष्ट्राचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन येत्या डिसेंबरमध्ये ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार असून तेथूनच त्यांची वाघ बचाओ मोहीम सुरू होणार आहे. त्या दृष्टीने राज्याचे वनखाते कामाला लागले आहे.
महानायक अमिताभ बच्चन व भारतरत्न खासदार सचिन तेंडूलकर यांनी राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांचे व्याघ्रदूत होऊन वन पर्यटनासोबत व्याघ्र संरक्षणाला चालना द्यावी, अशी विनंती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. त्यांच्या विनंतीचा स्वीकार करत बिग बी अमिताभ बच्चन यांनी १० ऑगस्टला वनखात्याला होकार कळविल्यामुळे आता वनख्यात्याने वाघ बचाओ मोहीम कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी सुरू केली आहे. वनखात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या डिसेंबरमध्ये अमिताभ बच्चन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देणार असून तेथूनच त्यांची वाघ बचाओ मोहीम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन सध्या एनडीटीव्हीसोबत वाघ बचाओ मोहिमेत सहभागी झाले आहेत. सध्या त्यांचे काम देशपातळीवर सुरू आहे. मात्र, आता ते खास महाराष्ट्रातील ताडोबा, मेळघाट, पेंच, सह्य़ाद्री, नवेगांव-नागझिरा व बोर या, तसेच सहा व्याघ्र प्रकल्पांचे व्याघ्रदूत म्हणून काम करणार आहेत. आज देशभरात २२२६ पट्टेदार वाघ आहेत. यातील २०२ वाघ राज्यातील व्याघ्र प्रकल्पात आहेत. देशातील पहिल्या दहा व्याघ्र प्रकल्पात ताडोबा व मेळघाटचा समावेश आहे.  २००६ मध्ये राज्यात १०३ वाघ होते. २०१० मध्ये १६९ व २०१४ मध्ये १९० वाघ आहेत. राज्यात निरंतर वाढणारी वाघांची संख्या वाघांच्या संवर्धनातील महत्वाचे मुद्दे ओळखून त्यावर उपाय केल्याचे द्योतक आहे. यातही चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात ११० वर वाघ आहेत. ही संख्या लक्षात घेऊनच महानायक अमिताभ बच्चन यांनी चंद्रपुरातून वाघ बचाओ मोहिमेचा प्रारंभ करण्यास होकार दिल्याची माहिती आहे. दरम्यान, स्वत: बच्चन व्याघ्रदूत झाल्यामुळे वनखात्यात सध्या आनंदाचे वातावरण आहे. कारण, यापूर्वी ताडोबा किंवा राज्यातील अन्य कोणत्याही व्याघ्र प्रकल्पाला वाघ बचाओ कार्यक्रमाचे आयोजन करतांना बरेच परिश्रम व प्रचारही करावा लागत होता. मात्र, आता महानायकच सोबतीला असल्यामुळे बचाव मोहीम नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास वनाधिकारी व्यक्त करत आहेत. दरम्यान, डिसेंबरमध्ये नेमक्या केव्हा महानायक ताडोबात येतील, हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्या दृष्टीने सुधीर मुनगंटीवार व वनखाते कामाला लागले आहे. बच्चन यांनी व्याघ्र संवर्धन व संरक्षणाबाबत आपण आवाहन केल्यास नक्कीच वाघाच्या संरक्षणाच्या दृष्टीने फलदायी राहील, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.