विविध पुरस्कारही जाहीर

व्याख्याने, प्रश्नमंजुषा, मराठी कवितांचा कार्यक्रम, नाटय़ प्रयोग अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी साहित्यप्रेमींना येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ग्रंथालय सप्ताहामुळे मिळणार आहे. ९ ते १५ डिसेंबर या कालावधीत आयोजित या सप्ताहात विविध पुरस्कारही दिले जाणार आहेत. त्यात सावित्रीबाई वावीकर पुरस्कार विजय तळेगांवकर यांना तर, उत्कृष्ट बालवाचक पुरस्कारासाठी अक्षता कुलकर्णी व निनांशु गुजराथी, उत्कृष्ट वाचक पुरस्कार उषा परांजपे आणि एकनाथ गांगल यांना जाहीर झाले आहेत.सप्ताहातील उपक्रमांची माहिती कार्यवाह कर्नल आनंद देशपांडे यांनी दिली. सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता होणार आहेत. पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे ‘परीघ वाचन संस्कृतीचा आणि दृष्य संस्कृती’ या विषयावर व्याख्यान होईल. या कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. सोमवारी प्रश्नमंजुषा असून त्यात कोणत्याही वाचकास भाग घेता येईल. मंगळवारी गिरीश टकले यांचे ‘मध्ययुगीन महाराष्ट्रातील स्थित्यंतर’, बुधवारी चित्रपट समीक्षक विजय अहलुवालिया यांचे ‘कविता की वैश्विकता’ या विषयावर िहदीतून व्याख्यान होईल. या कार्यक्रमात एम. लिब वर्गात प्रथम आलेल्या वंदना जडे आणि बी. लिबमध्ये प्रथम आलेल्या राजेश्री साबळे यांना मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्काराने र, बारावीत प्रथम आलेल्या निखिल महाजन यास भावना भार्गवे पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सप्ताहात गुरुवारी कल्पक ग्रुप जुन्या मराठी कवितांचा कार्यक्रम सादर करेल. या कार्यक्रमात केवळ काव्य वाचनच नव्हे तर नृत्य, गायन, अभिनय, नेपथ्य व वेशभूषा यांचा मिलाफ स्लाईड शोसह पाहावयास मिळणार आहे. १४ तारखेला दीपक मंडळ प्रस्तुत ‘रात्र काळी घागर काळी’ हा दोन अंकी नाटकाचा प्रयोग होईल. समारोपाच्या दिवशी शनिवारी कीर्तनचंद्र श्रेयस बडवे व कीर्तनचंद्रीका मानसी बडवे या युवा कीर्तनकारांची जुगलबंदी रंगणार आहे. परशुराम साईखेडकर नाटय़गृहात होणाऱ्या या कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.