भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती संपुष्टात आली तर, या दोन्ही पक्षांना जिल्ह्य़ातील बाराही मतदारसंघात उमेदवार उभे करणे जिकिरीचे होणार आहे. काही ठिकाणी दोघांनाही तुल्यबळ उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे. त्यामुळेच भाजपने दोन्ही काँग्रेसमधील आणखी काही असंतुष्टांचा शोध सुरू केला असून काही मतदारसंघात राजकारण विरहित नावेही चर्चेत पुढे आल्याचे समजते.
भाजप-शिवसेना युतीतील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना युती कायम रहावी असेच वाटते, मात्र तरीही दोन्ही पक्षात एक मोठा वर्ग स्वबळावर निवडणूक लढवण्यास उत्सुक आहे. अशांचे प्रमाण तुलनेने भाजपत अधिक आहे. विधानसभा निवडणुकीला आता केवळ पंचवीस दिवस राहिले असताना दोन्ही पक्षातील राज्य पातळीवरील जागावाटपाचा तिढा अद्यापि सुटलेला नाही, त्याचेच पडसाद आता गाव पातळीवर उमटू लागले आहेत. हा निर्णय होत नसल्याने कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ आहेत. दोन्ही पक्षांमधील विद्यमान आमदारांची उमेदवारी निश्चित मानली जाते. युतीच्या जिल्ह्य़ातील अशा पाच आमदारांनी त्याअनुषंगानेच प्रचाराला सुरूवात केली आहे, मात्र हा त्या, त्या पक्षाचाच प्रचार सुरू आहे. शिवसेनेकडे असलेल्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपकडे असलेल्या मतदारसंघात शिवसनेच्या कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली आहे. दोन्ही पक्षात याबाबत सावध भूमिका घेण्यात आली आहे.
नगर शहरात ही गोष्ट प्रकर्षांने जाणवते. येथून आमदार अनिल राठोड यांची उमेदवारी निश्चित आहे. मात्र राज्य पातळीवरचाच निर्णय रखडल्यानेच अद्यापि कोणत्याच पक्षाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीची घोषण झाली, त्याच्या पुढच्याच दिवशी राठोड यांनी शहरात धडाक्यात प्रचाराला सुरूवात केली. सुरूवातीचे एक, दोन दिवस भाजपचे अपवादात्मक कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात सहभागी झालेही, मात्र जागावाटपाचा तिढा तीव्र होताच त्यांच्या प्रचारातून हे तुरळक कार्यकर्तेही बाजूला झाले आहेत.
दरम्यान राज्य पातळीवर वाढत चाललेला तणाव लक्षात घेऊन जिल्ह्य़ातील बारा जागा लढवण्याची वेळ आलीच तर, तयारी असावी म्हणून भाजपने उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. शिवसेनेलाही ते करावे लागेल, मात्र दोन्ही पक्षांना बाराही मतदारसंघात तुल्यबळ उमेदवार मिळणे मुश्कील होणार आहे. जेथे पक्षाकडे तुल्यबळ उमेदवार नाही, अशा ठिकाणी दोन्ही काँग्रेसमधील आणखी काही असंतुष्ट गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न दिसतो. त्यादृष्टीने काही नावांची चाचपणीही सुरू करण्यात आली आहे. युती न झाल्यास शिवसेनेला जिल्ह्य़ात श्रीगोंदे, शेवगाव-पाथर्डी, राहुरी आणि कर्जत-जामखेड या चार मंतदारसंघात व भाजपला अकोले, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर व पारनेर या पाच मतदारसंघात तुल्यबळ उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Search of shivsena bjp
First published on: 22-09-2014 at 02:40 IST