कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर संस्थानच्या अजब कारभारामुळे अनेक दिवसांपासून मोठा गोंधळ उडाला आहे. दर्शनरांग, बायोमेट्रिक नोंदणी यासह अनेक कारणामुळे पुजारी, व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असताना मंदिरातील गुप्तदान पेटय़ाच आता चक्क रस्त्यावर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिर संस्थानचा कारभार शहरवासीयांमध्ये कुचेष्टेचा विषय ठरू लागला आहे.
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा कारभार अनेक दिवसांपासून मनमानी निर्णयामुळे वादग्रस्त ठरला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव घाटशीळ पाíकंगमधून प्रवेश देऊनही १८ भक्त जखमी झाले. याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांनी न घेता विषय दडपून टाकण्यात आला. कोजागरी पौर्णिमा यात्रेनंतर पुन्हा राजे शहाजी महाद्वारामधून प्रवेश सुरू करण्यात आला. मात्र चक्क दोन दानपेटय़ाच राजे शहाजी महाद्वारासमोरील भररस्त्यात आणि अवघ्या सात फुटावर राजमाता जिजाऊ महाद्वारसमोर दुसरी दानपेटी ठेवल्याचा प्रकार शनिवारी निदर्शनास आला.
भररस्त्यात दानपेटय़ा ठेवल्याची माहिती पुजारी, व्यापाऱ्यांना कळताच तुळजापुरात चर्चेला उधाण आले. यापूर्वी कधीच घडले नाही, असा प्रकार म्हणजे देवीच्या दानपेटय़ा महाद्वाराबाहेर भररस्त्यात ठेवण्यात आल्या. सुमारे १२० कोटी रुपयाची ठेव, वर्षांला सुमारे २५ कोटीचे रोकड उत्पन्न, १० कोटी रुपये निव्वळ व्याज कमविणाऱ्या संस्थानला रस्त्यावर दानपेटय़ा ठेवून काय साध्य करायचे आहे? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
भक्तांना मंदिरात प्रवेश देण्याच्या पध्दतीत पुन्हा बदल करून संस्थानने दोन्ही महाद्वारासमारे लोखंडी बॅरिकेड्स उभे करून अडथळा निर्माण केला आहे. ते काढण्यात यावेत, अशी व्यापाऱ्यांची मागणी मंदिर संस्थानच्या कारभाऱ्यांनी धुडकावली आहे. त्यामुळे पुजाऱ्यांपाठोपाठ व्यापाऱ्यांमधूनही तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन दर्शन कार्ड, पेडदर्शन व अभिषेक कार्ड वितरण नवीन धर्मशाळेच्या समोर मंडप उभारून सुरू करण्यात आले आहे. तेथेदेखील महाद्वारपर्यंत अनावश्यक लोखंडी बॅरिकेड्स कायम ठेवली असल्याने गर्दीचे नियंत्रण व यात्रेकरूंना वावरण्यास मिळणारी मोकळी जागा बंदिस्त झाली आहे. अजूनही मंदिरच्या खासगी सुरक्षारक्षकांची मनमानी सुरूच आहे.