पक्ष्यांचा हजारो किलोमीटर स्थलांतर करून येण्याचा प्रवास अनेकदा अद्भूत वाटतो. अनेक पक्षी ऋतू बदलताच मूळ प्रदेश सोडून इतरत्र जातात व काही काळ घालवून मायदेशी परततात. आकाशात झेप घेऊन विलोभनीयतेचे सुखद दर्शन देणारे ‘सी-गल’ पक्षी त्यापैकीच एक .
भारताच्या सीमेवर असणाऱ्या ‘लडाख’ मधून हजारो ‘सी-गल’ पक्षी कोकणच्या समुद्र किनारपट्टीवर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून  आले आहेत. मुरुड-जंजिरा शहरानजीक असणाऱ्या समुद्रकिनारी राजवाडय़ाजवळ सकाळच्या प्रहरी थव्याने आकाशात झेप घेणारे ‘सी-गल’  वातावरणाचे रूपच पालटून टाकतात.  लाड भडक चोच, लाल पाय, पांढरे शुभ्र पीसांनी वेढलेले शरीर मनाला मोहरून टाकते. लडाखमध्ये सध्या बर्फवृष्टी होत असल्याने पक्ष्यांना खाद्य मिळणे कठीण होते. शिवाय प्रजननास परिसर अनुकूल नसतो. त्यामुळे हजारोंच्या संख्येने हे पक्षी कोकणासह  अन्य भागात वास्तव्यास येतात. समागमानंतर साधारणत: फेब्रुवारी महिन्यात हे पक्षी अंडी घालण्यासाठी मायदेशी परततात. लडाख ते कोकण शेकडो किलोमीटरचे अंतर ते एकाच उड्डाणात पूर्ण करतात. पक्ष्यांचा प्रवास हा ऋतुमानानुसार अन्न व प्रजनन अनुकूल क्षेत्रापर्यंत जाण्याचे साहसी अभियानच असते.
   जगभरात पक्ष्यांच्या ९ हजार प्रजाती आढळतात. पैकी १२२५ प्रजाती भारतात आढळतात. स्थलांतर करणारे पक्षी १५ हजार कि.मी.चे अंतर साधारण: ३ महिन्यांत ताशी २० ते २५ कि.मी. प्रमाणे कापतात.