सिडको येथील जैन मंदिरामधील पंचधातूच्या मूर्ती, तसेच चांदीची भांडी, सोन्याचे पदक असा सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याप्रकरणी दोघा तरुणांना पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोनच्या विशेष पथकातील पोलिसांनी अखेर अटक केली. आरोपींनी मंदिरात चोरी केलेल्या देवीच्या चरणपादुका काढून दिल्या, तसेच अन्य माल भंगार विक्रेत्यास विकल्याची कबुली दिली. मार्चच्या पहिल्या आठवडय़ात घडलेल्या या मोठय़ा चोरीमुळे शहरात खळबळ उडाली होती.
अनिस खान खलील खान (वय २२) व शेख कलीम शेख सलीम (वय २२, दोघेही टाऊन हॉल, असेफिया कॉलनी, औरंगाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेल्या ५ मार्चला रात्री साडेअकरा ते ६ मार्चला पहाटे अडीच दरम्यान ही चोरी झाली. सिडको येथील एन ११ भागातील सुदर्शननगर येथे असलेल्या जैन मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटय़ांनी मंदिरातील लोखंडी कपाटामध्ये, तसेच मंदिरातील मुख्य मूर्तीसमोरील चांदीची भांडी, मूर्ती व देवीच्या अंगावरील सोन्याचे पदक असा ऐवज चोरून नेला होता. कळस, अभिषेकाची झारी, प्लेट, वाटी (१६ नग) अशी चांदीची २ किलो ८५० ग्रॅम वजनाची भांडी (किंमत १ लाख ७० हजार रुपये), सोन्याचे दोन ग्रॅमचे दोन पदक (किंमत ६ हजार रुपये), ५ हजार रुपये किमतीची पितळेची भांडी, याशिवाय पंचधातूच्या वेगवेगळय़ा दैवतांच्या ८ मूर्ती (किंमत निश्चित नाही) असा मोठा ऐवज चोरटय़ांनी लांबविला होता. या प्रकरणी प्रशांत शहा (वय ६१, एन ११, सुदर्शननगर) यांनी फिर्याद दिली. त्यावरून सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. या गुन्हय़ाचा तपास परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्याकडे देण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीश खटावकर यांच्यासह विशेष पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.