आरोग्य विभागात खळबळ
चंद्रपूर:शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्र शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील वरिष्ठ सहायक शेख सलीम शेख मौलाना (५०) याला वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी ५० हजार रूपयांची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रूग्णालय विविध कारणांनी गाजत आहे. अव्यवस्थेसोबतच येथे रूग्णांना खासगी डॉक्टर स्वत:चे रूग्णालयात उपचारार्थ घेवून जात असल्याच्या तथा वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असल्याच्या तक्रारी आहेत. अशातच सिंदेवाही येथील रहिवासी असलेल्या तक्रारदार युवकाने वडीलांना वैद्यकीय प्रमाणपत्र मिळावे यासाठी रितसर अर्ज केला होता. नेत्र शल्यचिकित्सा शास्त्र विभागातील वरिष्ठ सहायक शेख सलीम शेख मौलाना यांनी या कामासाठी ५० हजाराच्या लाचेची मागणी केली होती. विशेष म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील वैद्यकीय मंडळाचे अध्यक्ष कुमरे यांची स्वाक्षरी घेवून अहवाल द्यायचा होता. दरम्यान लाच दिल्याशिवाय प्रमाणपत्र मिळणार नाही असे शेख मौलाना याने सांगितले. दरम्यान या प्रकरणाची तक्रार फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज मंगळवारी वरिष्ठ सहायक शेख सलीम शेख मौलाना याला ५० हजाराच्या लाचेची रक्कम स्विकारतांना मुद्देमालासह अटक केली. या प्रकरणी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे,पो.नी. शिल्पा भरडे, रमेश दूपारे, मनोहर एकोनकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, नरेशकुमार नन्नावरे, रवी ढेंगळे, समिक्षा भोंगळे, सतिश सिडाम यांनी यशस्वीपणे पार पाडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior assistant government medical college arrested while accepting bribe rs 50000 ssh
First published on: 28-09-2021 at 22:42 IST