हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग : लोकसभेत शिवसेनेचे प्रदीर्घ काळ प्रतिनिधित्व करणारे, केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांचा पदभार सांभाळणारे, अनंत गीते सध्या विजनवासात गेले आहेत. जुन्या नेत्यांना बेदखल करून नव्या नेत्यांनी संधी देण्याचे धोरण पक्षाने स्वीकारले आहे. त्यामुळे गीतेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला विसर पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शिवसंपर्क अभियानापासून गीतेंना दूर ठेवण्यात आले आहे.

supreme court
राज्यातील खारफुटीच्या जंगलातून गॅस पाइपलाइन टाकण्याचं प्रकरण, सर्वोच न्यायालयाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश
bachchu kadu
“तुला माझ्याशिवाय कोणी दिसत नाही? रात्री स्वप्नात येईन अन्…”, बच्चू कडूंचा रवी राणांना टोला
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
Nashik, Fraud, developing place,
नाशिक : जागा विकसित करण्याच्या बहाण्याने फसवणूक, सात जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

शिवसेनेचे ज्येष्ठ आणि लोकनेते अशी अनंत गीते यांची ओळख आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळेच सलग सहा वेळा लोकसभेवर निवडून जाण्याचा करिष्मा त्यांनी करून दाखविला आहे. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्याची संधी शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दीला ग्रहण लागल्याचे दिसून येत आहे.

पक्षाच्या कार्यक्रमातून त्यांना हळूहळू बेदखल करण्यात आले आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर श्रीवर्धनमधील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. गीतेंच्या वक्तव्यावर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसमधील संबंध ताणले गेले होते. सुनील तटकरे यांनी गीतेंवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यानंतर शिवसेनेकडून गीतेंना अडगळीत टाकण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. शिवसेनेच्या कार्यक्रमातील बॅनरवरूनही गीते बेदखल होत गेले.

करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी नुकताच कोकण दौरा केला होता. माणगाव येथे जाहीर सभाही घेतली होती. या सभेपासूनही अनंत गीते यांना दूर ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील शिवसेनेची सूत्र यानिमित्ताने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केंद्रित झाल्याचे या निमित्ताने पाहायला मिळाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनी राज्यभरात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानात शिवसेनेचे मंत्री आणि खासदार राज्यभरात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाचे काम लोकांपर्यंत पोहचवणार आहेत. या शिवसंपर्क अभियानापासूनही गीते यांना दूर ठेवण्यात आल्याचे दिसून येत आहे. शिवसंपर्क अभियानाच्या नियोजनाची धुरा आमदार भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला गीतेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचा विसर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कुणबी समाज आणि गीते..

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात कुणबी समाज मोठय़ा संख्येने आहे. गीते या समाजाचे प्रतिनिधित्व करतात. कुणबी समाजाचे प्रतिनिधित्व करणारा दुसरा मोठा नेता शिवसेनेकडे नाही. अशा परिस्थितीत गीतेंना पक्षातून बेदखल करण्याची किंमत शिवसेनेला आगामी काळात भोगावी लागू शकते. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेतून बेदखल झालेल्या गीतेंना भाजपकडून जवळ करण्याचे प्रयत्न झाल्यास नवल वाटायला नको.