माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दोघांनी केलेल्या गोळीबारातून ते सुदैवानेच बचावले. या मारेक-यांबाबत विविध तर्क व्यक्त होत आहेत.
गायकवाड हे सोमवारी रात्री त्यांच्या मोटारीने नगरहून पुण्याकडे निघाले असताना शहरापासून जवळच मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. मोटारीत गायकवाड हे एकटेच होते, तेच मोटार चालवत होते. या गोळ्या मोटारीच्या काचांना लागून त्या फुटल्या, या प्रकाराने गायकवाड हेही गोंधळून गेले. या गडबडीत स्टिअरिंगवर डोके आदळून ते किरकोळ जखमी झाले, मात्र तोपर्यंत अज्ञात मारेकरी पळून गेले होते. राज्यमार्ग पोलिसांनीच गायकवाड यांना शहरातील आनंदऋषी रुग्णालयात दाखल केले.
सुदैवानेच गायकवाड या हल्ल्यातून बचावले. मात्र त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो, असा अंदाज व्यक्त होत आहे. मारेक-यांबद्दल अद्यापि कोणतीच माहिती उपलब्ध झालेली नाही. कोतवाली पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून उपाधीक्षक डी. वाय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक हनपुडे तपास करीत आहेत.