वर्धा : एका आमदार पुत्रासह मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या सात विद्यार्थ्यांचा मंगळवारी सकाळी कार अपघातात जागीच मृत्यू झाला़ 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा-देवळी मार्गावरील सेलसुरा येथे पुलावरून झायलो वाहन ४० फूट खाली कोसळून हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये नीरज चव्हाण (गोरखपूर), विवेक नंदन (गया), पवन शक्ती (गया), आविष्कार रहांगडाले (तिरोडा), प्रत्यूश सिंग (गोरखपूर), शुभम जयस्वाल (चंदोली), नितेशकुमार सिंग (ओडिशा) यांचा समावेश आहे. आविष्कार हा तिरोडा गोरेगावचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता एक मुलगा होता. हे सर्व वैद्यकीय शाखेच्या प्रथम व द्वितीय वर्षांचे विद्यार्थी होते.

एका ट्रक चालकाने सावंगी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पहाटे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस पाटील, गावकरी यांच्या मदतीने जेसीबीने अपघातग्रस्त वाहन बाहेर काढण्यात आले. भरधाव वेगात असलेली झायलो गाडी दुभाजकावर आदळल्याने हा अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. मृत नितेश सिंग याच्या मालकीची ही गाडी होती. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. संस्थेचे दत्ता मेघे यांनी संबंधित पालकांना कळवण्याबरोबरच आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना व्यवस्थापनास दिल्या.

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून शोक   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करीत या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला. पालकमंत्री सुनील केदार यांनी ही घटना मनाला चटका लावणारी असून, वैद्यकीय शिक्षण घेणारे हे विद्यार्थी देशाचे भविष्य असल्याने मन खिन्न झाले आहे, अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत विद्यार्थ्यांच्या पालकांना दु:ख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. आमदार डॉ. पंकज भोयर यांनीही शोकसंवेदना व्यक्त केल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seven medical students killed in accident in wardha district zws
First published on: 26-01-2022 at 03:49 IST