राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यापासून दोन्ही गट सातत्याने आमनेसामने येत आहेत. दोन्ही गटांमधील नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अजित पवार गटातील बहुतांश नेते थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि इतर नेत्यांवर हल्लाबोल करत आहेत. परंतु, शरद पवारांच्या गटातील नेत्यांच्या भूमिका काहीशा मवाळ आहेत. त्यामुळे काही लोकांना आशा आहे की अजित पवारांचा गट परत येईल. परंतु, या आशा आता मावळल्या आहेत. कारण बंडखोरांसाठी परतीची दारं बंद असल्याचं वक्तव्य खुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी रविवारी (१० सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार म्हणाले, कळत नकळत आपल्यातले काही सहकारी हळूच एक शंका काढतात. आता झालंय ते ठीक आहे आम्ही कामाला लागतो, परंतु, ते परत आल्यावर काय? अशी शंका विचारली जाते. ते आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपण यासंबंधीचे निर्णय घेणार नाही. अशा संकटाच्या काळात जे मबजुतीने उभे राहीले ते खरे आणि त्यांच्याच मदतीने आपल्याला निवडणुकीला समोरं जावं लागेल

दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी जी-२० परिषदेतील सोन्या-चांदीच्या ताटांवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना फटकारलं. जी२० परिषदेवर बोलताना शरद पवार म्हणाले, “देशात २० देशांची मोठी परिषद सुरू आहे. अशा परिषदा देशात याआधी दोनदा झाल्या आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना एकदा अशी परिषद झाली होती आणि अशीच एक परिषद आणखी एकदा झाली होती. आता देशात तिसऱ्यांदा जी-२० परिषद होत आहे. पहिल्या दोन परिषदांनाही जगातील अनेक मान्यवर लोक आले होते, परंतु, त्यावेळी आजच्यासारखं वातावरण तयार करण्यात आलं नव्हतं. माझ्या वाचनात कधी आलं नाही की आधीच्या दोन्ही परिषदांना चांदीची ताटं, सोन्याची ताटं आणखी काय काय होतं.

हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंचं सरकार पडत होतं त्याच वेळी…”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार म्हणाले, सध्या देशात महत्त्वाचे प्रश्न बाजूले ठेवले जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना हवं तसं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, सामान्य जनतेचं हित, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आजचे राज्यकर्ते गांभीर्याने पाहत नाहीत.