सातारा : आधुनिक विज्ञानयुगाला सामोरे जाण्याची ताकद, रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया. राज्याचा सर्वांगीण चेहरा मोहरा बदलण्यासाठी रयत कुटुंब हे सर्वोत्तम योगदान देईल. आज गुणवत्ता वाढवणे हे आपल्यासमोरील आव्हान असून आधुनिक विज्ञान युगाला सामोरे जाण्याची ताकद रयतच्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करूया, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६६ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते.यावेळी कार्यकारी मंडळाचे सदस्य उपमुख्यमंत्री अजित पवार, खा सुप्रिया सुळे, आमदार मकरंद पाटील, आ. दिलीप वळसे-पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पवार, चेतन तुपे, आशुतोष काळे, बाबासाहेब देशमुख, सुनील भुसारा, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, रामशेठ ठाकूर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वांसाठी शिक्षण खुले करणारी रयत शिक्षण संस्था हे एक मोठे कुटुंब आहे. या शैक्षणिक कार्यासाठी विद्यार्थ्यांशी बांधिलकी असणारा रयतचा शिक्षक हाच रयतचा केंद्रबिंदू आहे. संस्थेकडून सातत्याने गुणवत्ता आणि कौशल्य वाढविण्यासाठी प्रत्येक शाखेत विविध उपक्रम राबविले जातात. सध्या काही शाखेत पटसंख्या कमी झालेली असून पटसंख्या आणि गुणवत्ता यावर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कर्मवीर अण्णांनी ज्ञानदानाचे काम करण्याची दूरदृष्टी दिलेली आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी संस्थेच्या वर्षभरातील कार्याचा व भविष्यातील ध्येयधोरणांचा आढावा घेतला. जागतिक मराठी अकादमी यांच्या सहयोगाने शोध मराठी मनाचा हे २० व्या जागतिक मराठी संमेलनाचे आयोजन, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रथम पदवीदान समारंभाचे आयोजन, राजभवनामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे विद्यार्थी यांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम आदीं बाबत माहिती दिली. प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. आभार सहसचिव बी. एन. पवार, सूत्रसंचालन डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे कार्यकारी मंडळाचे सदस्य, आजीव सदस्य, विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.