नगर : देशातील सत्ताधाऱ्यांचे जाती-धर्माच्या आधारे संघर्ष निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; पण कर्नाटकातील निकालाने हे चित्र बदलताना दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील असाच बदल एकजुटीने देशातही होऊ शकतो, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.

राज्य हमाल-मापाडी महामंडळाचे २१ वे द्वैवार्षिक अधिवेशन नगर शहरात आयोजित करण्यात आले होते. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी कामगार नेते, डॉ. बाबा आढाव होते. या वेळी माथाडींचे दिवंगत नेते तथा माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले यांच्या अर्धाकृती पुतळय़ाचे अनावरण व त्यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षगाथा’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

हमाल-मापाडींना संरक्षण देणाऱ्या कायद्यावर हल्ला करण्याचे काम काही जण करत आहेत. त्यांना माथाडी कायदा खुपतो आहे. हा कायदा जुना झाला असे ते सांगत आहेत; परंतु या कायद्यासाठी मोठा संघर्ष उभा करावा लागला. राज्यात नवे सरकार आल्यानंतर ३६ जिल्ह्यांचे एकच महामंडळ स्थापण्याचा प्रयत्न झाला, पण तो माथाडींनी हाणून पाडला. माथाडींवर गुंडगिरीचा व पैसे लुबाडण्याच्या प्रयत्नांचे आरोप करून या चळवळीला बदनाम करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याविरोधात आवाज उठवावा लागेल, असे पवार यांनी नमूद केले.