राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बहुसंख्य आमदारांचा आम्हाला पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांबरोबर गेलेल्या काही सहकाऱ्यांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आमची वेगळी भूमिका आहे, असं त्यांनी मला सांगितलं आहे. त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, “पक्षाच्या काही सदस्यांनी विशेषत: विधीमंडळाच्या सदस्यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली आहे, याचं चित्र आणखी दोन-तीन दिवसांत लोकांच्या समोर येईल. याचं कारण बंडखोरीमध्ये ज्यांची नावं आहेत, त्यातील काही लोकांनी आजच माझ्याशी संपर्क साधला आहे. आम्हाला याठिकाणी निमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे. आमची भूमिका कायम आहे, याचा खुलासा अजित पवारांबरोबर गेलेल्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे याबाबत मी आताच काही बोलू इच्छित नाही.”

हेही वाचा- राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ, मंत्रिमंडळात सामील झालेल्या नेत्यांची संपूर्ण यादी

बंडखोरीबाबतचं अधिक स्पष्ट चित्र माझ्या इतकेच जनतेच्या समोर मांडण्याची आवश्यकता आहे. त्यांनी (बंडखोर आमदारांनी) जर त्यांची भूमिका जनतेसमोर मांडली तर त्याबद्दल माझा विश्वास बसेल. त्यांनी तशी भूमिका मांडली नाही, तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढेन,” अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

हेही वाचा- महाराष्ट्रात राजकीय महाभूकंप, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये होणार सामील

शरद पवार पुढे म्हणाले, “आता प्रश्न राहिला पक्षाच्या भवितव्याबद्दल… तर आज जो प्रकार घडला आहे, तो इतरांसाठी नवीन असेल माझ्यासाठी नवीन नाही. मला आठवतंय १९८० साली मी ज्या पक्षाचं नेतृत्व करत होतो. तेव्हा ५८ आमदार निवडून आणले होते. पण एक महिन्यानंतर ५८ पैकी ६ आमदारांव्यतिरिक्त सगळे आमदार पक्ष सोडून गेले. मी ५८ आमदारांचा नेता होतो. त्यानंतर मी केवळ पाच आमदारांचा नेता झालो. त्या पाच लोकांना घेऊन मी पुन्हा पक्ष बांधायला महाराष्ट्रात बाहेर पडलो. पुन्हा पक्षाची बांधणी करायची हाच माझा उद्देश होता. पाच वर्षांनी निवडणूक झाली, तेव्हा त्या निवडणुकीचं चित्र वेगळं होतं. आम्ही अधिक जागा जिंकल्या होत्या.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.