गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानांवरून राजकीय वर्तुळात चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे नेते असण्याबाबत व पक्षात फूट आहे की नाही यावर झालेल्या वक्तव्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यावर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी शरद पवार व अजित पवारांना टोला लगावला होता. त्यावरून आता खुद्द शरद पवारांनी बच्चू कडूंना खोचक शब्दांत सुनावलं आहे.

सुप्रिया सुळेंनी पुण्यात बोलताना “अजित पवार पक्षाचे नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही”, असं विधान केलं होतं. नंतर शरद पवारांनी त्या वक्तव्याचं समर्थन करताना “यात कोणताही वाद नाही”, असं म्हटलं. मात्र, नंतर अजित पवार पक्षाचे नेते असल्याचं आपण म्हटलोच नसल्याचा घुमजाव शरद पवारांनी केला. या सर्व पार्श्वभूमीवर अजित पवार २०१९ प्रमाणेच पुन्हा माघारी फिरण्यापासून ते शरद पवार एनडीएमध्ये सहभागी होण्यापर्यंत सर्व चर्चा झाली.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

दरम्यान, शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून आमदार बच्चू कडूंनी खोचक टिप्पणी केली होती. “शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत. ते जे बोलतात, तसं त्यांनी कधीच केलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आत्ताच्या खेळीनुसार पाहिलं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा कार्यकर्त्यांचं डोकं फुटू नये एवढंच मी सांगेन”, असं बच्चू कडू म्हणाले होते. “हे सूर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. काका-पुतणे संपूर्ण महाराष्ट्राला खुळ्यात काढत आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावाल होता.

“हे काका-पुतणे मिळून…”, शरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर बच्चू कडूंची खोचक टिप्पणी; म्हणाले, “हा मोठा गेम!”

शरद पवारांनी सुनावलं

दरम्यान, आज कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांना बच्चू कडूंच्या या वक्तव्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी यावरून बच्चू कडूंना अप्रत्यक्षपणे सुनावलं आहे. “बच्चू कडू कोण बाबा? मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. केंद्रात महत्त्वाची जबाबदारी होती. त्यामुळे तुम्ही उद्या तर आणखीन कुणा गल्लीबोळातल्या लोकांबाबतच्या प्रतिक्रिया मला मागाल”, असं शरद पवार यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पत्रकारांनी बच्चू कडू चार वेळा आमदार असल्याची आठवण करून देताच शरद पवारांनी “ते चार वेळा आमदार आहेत. मी चार वेळा मुख्यमंत्री होतो”, असं म्हणत मिश्किल टिप्पणी केली.