बारामती येथे एक आणि दोन मार्च रोजी होणाऱ्या नमो महा रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही. याच कारणामुळे या कार्यक्रमावर तसेच सत्ताधारी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यावर टीका केली जात आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या कार्यक्रमपत्रिकेवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेदेखील नाव नाही. दरम्यान, शरद पवार यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळालेले नसले तरी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जेवणाचे आमंत्रण दिले आहे.

अतिथी निवासात चहापानासाठी आमंत्रण

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून हे जेवणाचे आमंत्रण दिले आहे. बारामतीत आयोजित करण्यात आलेला हा महारोजगार मेळावा शरद पवार संस्थापक सदस्य असलेल्या बारामतीतील विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी येथे होत आहे. शरद पवार या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष या नात्याने शरद पवारांनी तिन्ही मान्यवरांना बारामतीतील अतिथी निवासात चहापानासाठी तसेच गोविंदबाग या त्यांच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले आहे.

rahul gandhi sanjay nirupam
“काँग्रेसने त्यांची उरलीसुरली ऊर्जा…”, संजय निरुपमांचा घरचा आहेर; म्हणाले, “माझ्यावर स्टेशनरी खर्च करू नका, मी उद्या…”
ravi rana bachchu kadu
“बच्चू कडूंसमोर हात जोडून विनंती करतो…”, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा नरमले?
Sharad Pawar
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शरद पवारांचा संताप; पोस्ट करत म्हणाले, “या अटकेवरून…”
devendra fadnavis and manoj jarange patil (1)
मनोज जरांगेंचा गौप्यस्फोट, “देवेंद्र फडणवीसांनी पहाटे तीन वाजता फोन केला आणि..”

शरद पवार यांच्या पत्रात नेमके काय आहे?

शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून खाली प्रतिलिपीच्या स्वरुपात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला आहे. ‘आपण २ मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे मला समजले. सदस शासकीय कार्यक्रमाप्रसंगी संसद सदस्य म्हणून मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. या कार्यक्रमाचे आयोजन मी संस्थापक सदस्य असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात आयोजित करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. करिता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणांस निमंत्रित करतो,’ असे पवार या पत्रात म्हणाले आहेत.

सस्नेह निमंत्रणाचा आपण स्वीकार कराल, अशी अपेक्षा

‘आपण मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमच येत आहात, याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील गोविंदबाग या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा असे मी आपणांस दुरध्वनीवरून यापूर्वीच निमंत्रण दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांसह या निमंत्रणाचाही विचार करावा. दोन्ही सस्नेह निमंत्रणाचा आपण स्वीकार कराल, अशी अपेक्षा व्यक्त करतो,’ असेही शरद पवार आपल्या पत्राच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

“…म्हणून शरद पवारांचे नाव टाकले नाही”

दरम्यान, या पत्रानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शरद पवार यांच्या घरी भोजनासाठी जाणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडे स्वतः शरद पवार यांनी राजशिष्टाचार विभागाला कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझे नाव टाकू नये, अशा स्पष्ट सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक शासकीय कार्यक्रमावेळी पवार यांचे नाव टाकण्यात येत नाही. त्यामुळे या कार्यक्रमातही नाव टाकण्यात आले नाही. मात्र आता पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल आणि नवी निमंत्रण पत्रिका तयार करण्यात येईल, असे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे.