काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. तसंच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या ठिकाणी पोहचले आहेत. आम्ही शरद पवारांना भेटण्यासाठी आलो आहोत. पुढचं नियोजन कसं असेल हा आमच्या भेटीचा उद्देश आहे. शरद पवार यांचं मार्गदर्शन अपेक्षित आहेत. असं नाना पटोले यांनी सांगितलं आहे. तसंच शरद पवारच अध्यक्ष आहेत अजित पवार काय म्हणतात त्या गोष्टीला फारसं महत्त्व नाही असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

काय म्हटलं आहे नाना पटोले यांनी?

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाविषयी जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे तो अगदी स्पष्ट आहे. आमदार कुणाकडे किती आहेत आणि खासदार कुणाकडे किती आहेत? यापेक्षा पक्ष हा सर्वात महत्त्वाचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कोण करतं? हे स्वतःच अजित पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार हेच नाव त्यांनी घेतलंय. अजित पवारांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेऊन बोलावं असा सल्लाही नाना पटोलेंनी दिला आहे.

संवैधानिक व्यवस्थेपेक्षा कुणीही मोठं नाही. परवा सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला. शेड्युल १० प्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्याचाच उल्लेख सर्वोच्च न्यायालयाने केला. शरद पवार हेच राष्ट्रवादीचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचाच आदेश चालणार, अजित पवार काहीही बोलले तरी काही फरक पडत नाही.

विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार का?

विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेस दावा करणार का? असं विचारलं असता पटोले म्हणाले, ” आम्ही काय भूमिका घ्यायची ते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करुनच निर्णय घेऊ. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा विरोधी पक्षनेता असतो. तरीही आम्ही ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी आम्ही घेऊ. सध्या आम्ही निर्णय घेतलेला नाही. ” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

प्रफुल्ल पटेल जे सांगत आहेत ते मोदी आणि शाह यांनी लिहून दिलेलं स्क्रिप्ट आहे. ते तसं बोलले नाहीत तर त्यांना तुरुंगात जावं लागेल असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.