मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केलेल्या भाषणामध्ये आमदारांसाठी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत मोफत घरं देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. तर, विरोधकांकडूनही टीका होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
“आमदारांना घरे देण्याचा महविकास आघाडी सरकारचा निर्णय आहे. आमदारांना घरं द्यायला नको, हे माझं वैयक्तिक मत आहे, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. गृहनिर्माण योजनेत कोटा ठरवून त्यात आमदारांना घरं द्या, आमदारांसाठी वेगळा गृहनिर्माण प्रकल्प राबवला जाऊ नये,” असं शरद पवार यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या निर्णयावरून शरद पवारांनी सरकारच्या निर्णयाशी असहमती दिल्यानंतर विरोधक टीका करत आहेत. तर, विरोधकांच्या टीकेला मी किंमत देत नाही, असं पवारांनी सुनावलं.
टीकेनंतर अजित पवारांचं स्पष्टीकरण –
“मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की, आमदारांना घरं देऊ, पण मीडियाने असं म्हटलं की, आमदारांना फुकट घरं देणार. पण मी सांगतो कुणालाही घर मिळणार नाही. ज्यांना मुंबईत घर नाही, अशा आमदारांना घरं देणार, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं, सरसकट सर्वांना नाही. मला आणि माझ्या बायकोला तर घर मिळूच शकत नाही,” असं अजित पवार स्पष्टीकरण देत म्हणाले होते.
जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण –
“आमदारांना देण्यात येणाऱ्या घरांवरून बराच गदारोळ होतोय. मी स्पष्ट करू इच्छितो की, सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत+बांधकाम खर्च (अपेक्षित खर्च ७० लाख) याची किंमत संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे,” असं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.