Sharad Pawar On Maratha-OBC Reservation Case : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून चांगलंच राजकारण तापलेलं आहे. यातच बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) सामील करा, अशी मागणी करत एकवटला ज्याला आदिवासी समाजांने विरोध दर्शवत मोर्चा काढला. राज्यातील या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

शरद पवार माध्यम प्रतिनिधींनी याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की, गेले काही दिवस अस्वस्थता वाढतेय असं दिसतंय. आज समाजा-समाजामध्ये मागण्याही आहेत आणि थोडा संघर्षही आहे. उदाहरणार्थ, कालच बंजारा समाजाने मोठा मोर्चा काढला आणि मागणी केली की आदिवासी समाजाच्या सवलती द्या. दुसर्‍या दिवशी आदिवासींचा मोर्चा झाला की आमच्यासाठी जो कोटा आहे त्यात बाहेरच्यांना घालू नका. त्यामुळे कारण नसताना दोन समाजात वातावरण बिघडत आहे. यापूर्वीही मराठी आणि मराठेत्तर यांच्यातही असंच वातावरण तयार झालं. मला वाटतं की राज्य सरकार त्यामध्ये पावले टाकत आहे. पण ती योग्य आहेत की नाही ते लवकरच कळेल.

दोन समित्यांची गरज होती का?

राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजाच्या आरक्षणासाठी दोन उपसमित्या नेमल्या आहे. याबद्दलही शरद पवारांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, राज्य सरकारने दोन समित्या नेमल्या, एक विखेंच्या अध्यक्षतेखाली आणि एक दुसरे मंत्री… (चंद्रशेख बावनकुळे यांच्या)…. मला असं वाटतं की सरकारने या दोन समित्या करण्याची आवश्यकता होती का? आणि ज्या केल्या त्यातील एक एका जातीची आहे आणि दुसरी एका जातीची… ज्या जातीची समिती असेल तिथे दुसर्‍या घटकांचं मत काय? याचा विचार होणार नाही. तिथं एका जातीपुरता होईल. तसंच मराठा समाजासाठी जी समिती आहे, त्यांचाही दृष्टीकोन त्या वर्गाच्या हिताच्या जपणुकीचा असेल.

इथे सामंजस्य, दोघांमध्ये एकता निर्माण करायची असेल तर वेगवेगळं बसून चालणार नाही शेवटी एकत्र बसावचं लागेल. पण सरकारने जातीवर आधारित दोन वेगवेगळ्या समित्या केल्या, त्यावर मी अधिकचं भाष्य करु इच्छित नाही. पण आता काहीही झालं तर सगळ्यांनी मिळून सामंजस्य कसं निर्माण होईल यासाठी पावले टाकली पाहिजे, आमचा दृष्टीकोन तो आहे, असेही शरद पवार म्हणाले.

फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

कोणतीही किंमत मोजायला आम्ही तयार आहोत. सामाजिक वीण जोपासली पाहिजे या शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना राज्याचे मुख्यमंत्र्‍यांनी एक विधान केले होते, पवारसाहेब एक्स बोलले की त्याचा वाय असा अर्थ निघतो, असे फडणवीस म्हणाले होते. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

याचा अर्थ वाय त्यांना कळत असेल तर मला काही म्हणायचं नाही. काहीही किंमत देऊन एकत्र आलं पाहिजे, कटुता थांबवली पाहिजे, या वाक्याचा अर्थ तसा होतो? मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा प्रसंगी सगळ्यांच्या संदर्भात एकवाक्यतेने पूरक वातावरणसाठी हातभार लावला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.