पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. ‘कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी काय केलं?’ असा सवाल मोदींनी शरद पवारांचा नामोल्लेख टाळून केला होता. याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“पंतप्रधान हे एक संवैधानिक पद आहे. संवैधानिक पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, हे मला समजतं. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे. मोदींनी सांगितलेली माहिती वास्तवापासून दूर आहे,” अशा शब्दांत शरद पवारांनी खडसावलं आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “कृषिमंत्री असताना काय केले?” पंतप्रधान मोदींच्या विधानाला शरद पवार प्रत्युत्तर देत म्हणाले…

“पंतप्रधानांनी धाडस दाखवलं आहे”

सत्तेत सहभागी होत नसल्यानं तुम्हाला लक्ष्य केलं जातंय? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, “पंतप्रधानांनी वक्तव्य कशासाठी केलं माहिती नाही. पंतप्रधानांनी देशात काय घडतंय? याचं वास्तव्य समजलं पाहिजे. पंतप्रधानांनी केलेलं वक्तव्य चुकीच्या माहितीमुळं करण्यात आल्याचं दिसतंय. माहिती नसताना वक्तव्य करण्यास धाडस लागतं. पंतप्रधानांनी धाडस दाखवलं आहे. पण, ते सत्यावर आधारीत नाही.”

“देशातील बहुसंख्य राज्यात भाजपाकडं सत्ता नाही”

मोदी तुमच्यावर टीका का करत आहेत? असे विचारल्यावर शरद पवारांनी सांगितलं, “देशात अस्वस्थता आहे. अनेक राज्यांत लोक बदलाच्या विचारात आहेत. गोवा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात फोडाफोडी करून सरकार आणलं. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, पंजाब आणि देशातील बहुसंख्य राज्यात भाजपाकडं सत्ता नाही. हे चित्र सगळीकडं दिसतंय. याचा धसका घेतल्यानं अशाप्रकारच्या गोष्टी मांडल्या असाव्यात.”

हेही वाचा : “…तेव्हा अजित पवारांनी मोदींसमोर मंचावरून उठून निघून जायला हवं होतं”; राऊतांची घणाघाती टीका, म्हणाले…

“लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा”

“विधानसभा निवडणुकांमध्ये बदल दिसतोय. पण, लोकसभा निवडणुकांबद्दल पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणार नाही. ‘इंडिया आघाडी’च्या कामाला गती द्यावी लागेल. लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा आहेत,” असं शरद पवारांनी सांगितलं.