करमाळा, अकलूजमध्ये नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आज माढय़ात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात स्वत:ची उमेदवारी घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे मतदारसंघात करमाळा व अकलूज येथे उद्या शुक्रवारी येत आहेत. या भेटीत पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्यासाठी पवार हे स्थानिक नेत्यांना एकत्र आणून खलबते करणार आहेत. मात्र पक्षांतर्गत मोहिते-पाटीलविरोधी राजकारणाचा एक भाग म्हणून भाजप पुरस्कृत महाआघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले ‘अजितनिष्ठ’ संजय शिंदे हे पवार यांच्या करमाळ्यातील भेटीत सहभागी होणार काय, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

करमाळा येथे उद्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता शरद पवार  येणार आहेत. श्री कमलादेवी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर मंदिराबाहेरच असलेल्या मंगल कार्यालयात करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात पवार हे मार्गदर्शन करणार आहेत.  या वेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील व त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे, करमाळ्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी दिगंबर बागल आदींची उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने एकमेकांच्या विरोधातील गट-तट एकत्र येणार आहेत.

बैठकीनंतर पवार हे सर्व सहकाऱ्यांसह रश्मी बागल यांच्या निवासस्थानी जाऊन एकत्रपणे स्नेहभोजन घेणार आहेत. या माध्यमातून पक्षातील एकोपा साधण्याचा प्रयत्न पवार हे करणार असल्याचे सांगितले जात असले तरी याच करमाळा विधानसभेच्या मागील २०१४ सालच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभे राहून पराभूत झालेले आणि आता पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी याच करमाळ्यातून जोरदार तयारी करीत असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे हे पवार यांच्या भेटीत सहभागी होणार काय, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांचा मूळचे मोहिते-पाटील गटाचे आमदार नारायण पाटील यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवर पराभव केला होता. तर संजय शिंदे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. आता पुन्हा राष्ट्रवादीकडून रश्मी बागल यांनी विधानसभेची तयारी सुरू केली असताना संजय शिंदे यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा पुरेपूर वापर करून करमाळ्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालविली आहे. ते माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आहेत. शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे भवितव्य मोहिते-पाटील गटावर अवलंबून आहे.

विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी दौरा

माढा लोकसभा निवडणुकीत विजयाचा मार्ग सुलभ होण्याकरिता स्वत: पवार यांनाच पक्षांतर्गत उफाळलेली गटबाजी संपविण्यासाठी मतदारसंघात फिरावे लागत आहे. करमाळा येथील बैठक आटोपल्यानंतर पवार हे अकलूज येथे जाणार आहेत. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषिप्रदर्शनाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमित्त साधून अकलूजमध्ये आल्यानंतर पवार हे मोहिते-पाटील आणि माढय़ाचे शिंदे यांच्यातील दरी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. २००९ पासून जिल्ह्य़ात राष्ट्रवादीमध्ये सुरू झालेल्या गटबाजीने सध्या टोक गाठले आहे. पक्षात मोहिते-पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांनी स्वत:ची फळी तयार केल्यानंतर ही गटबाजी अधिक फैलावली असताना त्याकडे शरद पवार यांनी नेहमीच काणाडोळा केला आहे. मात्र आता स्वत:च माढय़ातून लोकसभा निवडणूक लढविण्याचे ठरवल्यावर पवार यांनी ही गटबाजी दूर करण्याकडे लक्ष दिले आहे. एरवी राष्ट्रवादी काँग्रेसमधील या गटबाजीकडे बारामतीतून दुर्लक्ष होत असताना आता ती संपवण्यासाठी पवार यांनी स्वत:च पुढाकार घेतल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar put efforts to stop grouping in party
First published on: 01-03-2019 at 02:51 IST