scorecardresearch

“…म्हणून हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे”; मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे

Sharad Pawar reaction after ED action on CM Uddhav Thackeray wife brother

मनी लॉन्डिरग प्रकरणात मोठी कारवाई करत अंमलबजावणी संचालनालयाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने मंगळवारी ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील ११ निवासी सदनिका जप्त केल्या. ईडीच्या या कारवाईनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये केंद्रीय यंत्रणांचा होत असलेल्या वापराबाबत वाद सुरू होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते पुष्पक ग्रुपचे भागीदार आहेत. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेची अंदाजे किंमत ६.४५ कोटी रुपये आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेते ईडीच्या रडारवर होते, मात्र या कारवाईनंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुटुंब ईडीच्या रडारवर आल्याचे बोलले जात आहे.

या प्रकरणी शरद पवार यांनी कुणाला तरी त्रास देण्यासाठी कारवाया सुरु असल्याचे म्हटले आहे. “या सगळ्या साधनांचा गैरवापर हा देशाच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आकडेवारी स्पष्ट सांगते राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. पाच दहा वर्षापूर्वी इथल्या लोकांना ईडी नावाची संस्था माहिती नव्हती. आता ईडी गावागावामध्ये गेली आहे. या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या दुर्देवाने सध्या चालू आहे,” असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही – नितेश राणे

“हे आज ना उद्या होणारच होते. मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर असे छापे पडत असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. ईडीने छापा टाकून प्रॉपर्टी जप्त केली असेल तर सरळ सरळ हा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. पैसे मातोश्रीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे आता मातोश्रीने लोकांना उत्तर द्यावे. सचिन वाझेकडील पैसे कुठे फिरायचे हे आता बाहेर येत आहे. मुख्यमंत्र्यांना आता राजीनाम्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आता घरात लपून राहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यावे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

दरम्यान, ईडीने उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्याशी संबंधित असलेल्या पुष्पक ग्रुपवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील निलांबरी अपार्टमेंटचे ११ फ्लॅट सील केले आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार या फ्लॅट्सची किंमत ६.४५ कोटी आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, तपास यंत्रणेने २०१७ मध्ये पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता आणि पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती.

श्री साईबाबा गृहिणी समिती प्रायव्हेट लिमिटेड या शेल कंपनीच्या माध्यमातून ३० कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एका एंट्री ऑपरेटरच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात आले. श्रीधर पाटणकर यांनी याच पैशातून ठाण्यात ही ११ घरे खरेदी केल्याचा आरोप आहे. मनी लॉन्डिरग करून हे फ्लॅट खरेदी करण्यासाठी पैसे वापरण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar reaction after ed action on cm uddhav thackeray wife brother abn

ताज्या बातम्या