आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत. मात्र समोर पैलवान दिसत नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचारसभेत समाचार घेतला. या सभेत पवार म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात, त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असं प्रतित्युत्तर पवार यांनी दिलं.
आघाडीचे उमेदवार राजीव देशमुख यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची चाळीसगावमध्ये रविवारी सायंकाळी सभा झाली. यावेळी बोलताना पवार म्हणाले, “आपल्या भागाचा विकास करणारा एक उत्तम उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे. तुमच्या सुख-दुःखात उभं राहणारं व्यक्तिमत्व निवडून येण्याची गरज आहे. राजीव देशमुख यांचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. त्यामुळे त्यांना निवडून आणण्यात आपण कमी पडणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“राजीव देशमुख यांनी आपल्या भागात कारखाने आणले, तरुणाच्या हाताला काम दिलं. पण आजचे राज्यकर्ते कारखानदारी बंद करण्याच्या मागे आहेत. तरुणाच्या हातातील रोजगार काढून घेण्याचे काम यांनी केलंय. जेट सारखी कंपनी बंद पडली तर वीस हजार तरुण बेरोजगार झाले. मागची पाच वर्षे हातात सत्ता यांची आणि हे इथे येऊन आम्हाला बोलतात, तुम्ही काय केलं? तुम्ही जबाब द्यायला हवा! आज याचं उत्तर जनता देईल आणि २१ तारखेला तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा इशारा पवार यांनी दिला.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पैलवान नसल्याच्या दाव्याला उत्तर देताना पवार म्हणाले, “मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहित नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
मुख्यमंत्री सांगतात त्यांचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की आपल्या राज्यात कुस्ती हा महत्त्वाचा खेळ आहे आणि कुस्तीच्या राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे. आणि ते म्हणतात विरोधात पैलवान नाही. pic.twitter.com/T9jOJyq6lQ
— Sharad Pawar (@PawarSpeaks) October 13, 2019
“आज महर्षी वाल्मिकी यांची जयंती आहे. अमित शाह यांनी वाल्मिकी समाजाला काही सवलतींच्या बाबतीत आश्वासन दिलं होतं. पण शाह दिलेला शब्द किती पाळतात हे मला चांगलं माहीत आहे म्हणून चौकशी केल्यावर लक्षात आलं एकही आश्वासन पूर्ण केले नाही,” असंही पवार यावेळी म्हणाले.