गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या काही सदस्यांवर ईडीकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईवर सत्ताधाऱ्यांकडून देखील टीका केली जात आहे. यामध्ये अनिल देशमुख, भावना गवळी, प्रताप सरनाईक अशा काही नेत्यांची नावं आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तर ईडीनं लुकआऊट नोटीस देखील काढली आहे. मात्र, अजूनही अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिलेले नाहीत. यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यावरून खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ईडीच्या कारवाया म्हणजे राज्यांच्या अधिकारांवर गदा आहे, असं शरद पवार म्हणाले आहेत.

“देशात नवी यंत्रणा लोकांना माहिती झालीये…”

“गेल्या दोन-तीन वर्षांत देशात नवीन यंत्रणा लोकांना माहिती झाली आहे. त्या यंत्रणेचं नाव आहे ईडी. ही ईडी कुणाच्या मागे कशी लागेल काही सांगता येत नाही. कालच अकोल्यातून भावना गवळी नावाच्या शिवसेनेच्या खासदार आल्या होत्या. त्यांच्या ३-४ संस्था आहेत. ३ शिक्षणसंस्था आणि एक दुसरी छोटी संस्था आहे. त्याचा व्यवहारही २०-२५ कोटींच्या आत आहे. पण तिथेही ईडीने जाऊन त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलं”, असं शरद पवार म्हणाले.

“संसदेसमोर विषय मांडणार”

ईडीच्या या कारवायांचा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचं शरद पवार म्हणाले. “जिथे गैरव्यवहार झाला असेल, त्यासाठी आपल्या देशात कमिशन आहेत. त्याच्याकडे तक्रार केली जाऊ शकते. राज्य सरकारचं गृह खातं आहे. इथे तपासाची यंत्रणा असताना ईडीनं त्या संस्थांमध्ये जाऊन हस्तक्षेप करणं हे एका अर्थानं राज्यांच्या अधिकारांवर गदा आणणं आहे. याची अनेक उदाहरणं हल्ली ऐकायला मिळत आहेत. या गोष्टी मला योग्य वाटत नाही. जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होईल, तेव्हा या गोष्टी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू”, असं शरद पवार यांनी यावेळी नमूद केलं.

अनिल देशमुखांविरोधात लुकआऊट नोटीस

सध्या अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीनं आपली कारवाई तीव्र केली आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण देशमुख यांची याचिका ऐकू शकत नसल्याचे न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी स्पष्ट केल्याने दुसऱ्या एकलपीठासमोर या याचिकेची सुनावणी होणार आहे. याचदरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने अनिल देशमुख यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी केली आहे. १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या संदर्भात ईडीने ही लुकआऊट नोटीस जारी केली आहे. लुकआउट नोटीस जारी झाल्यानंतर अनिल देशमुख यांना देश सोडून जाता येणार नाही.

सरसंघचालक मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवार म्हणतात…

“ईडीच्या इतक्या केसेस तुम्ही ऐकल्यात का?”

“महाराष्ट्रात इतक्या वर्षांत इतक्या ईडीच्या केसेस कधी ऐकल्या आहेत का तुम्ही? खडसे, अनिल देशमुख, प्रताप सरनाईक अशा अनेक जणांच्या विरोधात केसेस आहेत. हल्ली विरोधकांना त्रास देण्यासाठी याचा साधन म्हणून वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठीक आहे. काही काळ येतो, नंतर जातो. जेव्हा हा काळ जाईल, तेव्हा यात दुरुस्त्या होतील”, असं देखील शरद पवार यावेळी म्हणाले.